होमपेज › Nashik › श्‍वासनलिकेत हरभरा अडकून बालकाचा अंत

श्‍वासनलिकेत हरभरा अडकून बालकाचा अंत

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:55AMसिडको : वार्ताहर

श्‍वासनलिकेत हरभरा अडकल्याने एका वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोतील हनुमान चौक परिसरात शुक्रवारी घडली.

येथील सुजाता बिजुटकर यांचा एक वर्षाचा मुलगा सुजय याने घरात खेळताना फरशीवर पडलेला हरभरा गिळला. हा प्रकार कुणाच्याचही लक्षात आला नाही. मात्र, श्‍वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने सुजयला त्याचे आजोबा व आई जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनाही त्याचे निदान होऊ न शकल्याने त्यांनी काही झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते घरी परतले. मात्र, पुन्हा  साडेआठच्या सुमारास सुजय जोरात रडू लागल्याने त्याला लहान मुलांच्या दवाखान्यात नेण्यात आले.

यावेळी त्याचा एक्स-रे काढण्यात आला. परंतु, त्यात श्‍वासनलिकेत हरभरा अडकला असल्याचे समजते. अखेर त्याचे रडणे थांबत नसल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, येथे उपचार सुरू असतानाच सुजयची प्राणज्योत मालवली. या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या श्‍वासनलिकेत हरभरा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच झाला वाढदिवस ः व्हॅलेंटाइन-डे च्या दिवशीच सुजयचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसाला हनुमान चौक परिसरातील सर्व रहिवासी उपस्थित होते. मात्र, काळाने अचानक सुजयवर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.