होमपेज › Nashik › कर्जबाजारी शेतकर्‍याची सिन्‍नर तालुक्यात आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची सिन्‍नर तालुक्यात आत्महत्या

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:24PMसिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (78) या वृध्द शेतकर्‍याने पांगरी शिवारात विहिरीत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.6) दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुलांच्या व स्वत:च्या नावे असणार्‍या कर्जाला कंटाळून संबंधीत शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लक्ष्मण साबळे हे मुळचे भोकणी येथील रहिवासी असून त्यांची भोकणीसह पांगरी शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी शेतीसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे 40 हजारांचे कर्ज काढलेले होते.

त्यांच्या शिवाजी या मुलाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचे 3 लाख रुपये तर रामदास या मुलाच्या नावे पांगरी विविध कार्यकारी सोसायटीचे 70 हजारांचे कर्ज असल्याचे समजते. गेल्या दोन-तीन वर्षात पिकांना बाजारभाव नसल्याने कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने लक्ष्मण साबळे यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पांगरी शिवारातील मुलाच्या नावे असलेल्या शेत गट नं. 436/2 मधील विहिरीत काल 4 वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.याबाबत वावी पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीबाहेर काढला. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वावी पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

Tags : Nashik, Suicides, debtor, farmer, Sinnar taluka