Tue, Apr 23, 2019 05:37होमपेज › Nashik › पाच वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात दुपटीने वाढ

पाच वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात दुपटीने वाढ

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:31PMनाशिक: धनंजय बोडके

आत्महत्या होऊ नये किंवा आत्महत्यांच्या प्रमाणात घट व्हावी, या उद्देशाने जगभर 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळण्यात येतो. विविध उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येत असते. गेल्या 5 वर्षात आत्महत्येत दुपटीने वाढ झाली आहे. ‘एकमेका सहाय्य करू, आत्महत्या थांबवू’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी जगात आठ ते नऊ लाख, तर भारतात दरवर्षी  दीड लाख व्यक्‍ती आत्महत्या करतात. या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. भारतामध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही दोन राज्ये आत्महत्यांच्या प्रमाणात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात गत पाच वर्षांत एकूण मानसिक रुग्णांच्या 10 टक्के रुग्ण उपचाराअभावी आत्महत्या करतात. तर वाढती व्यसनाधीनता, आजारपण, कौटुंबिक वाद, ताणतणाव, नकारात्मक मानसिकता, ढासळेलेली नितीमूल्ये, गुन्हेगारी कृत्य यामुळेदेखील आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. समुपदेशन आणि उपचार या दोन बाबींमुळे आत्महत्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत शहरातील मानसरोगतज्ज्ञांनी मांडले. एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर सर्वच घर उद्ध्वस्त होते. गेल्या दोन वर्षात  सर्वसामान्यांपासून आध्यात्मिक गुरू, पोलीस अधिकार्‍यांनी देखील  आत्महत्या केली आहे.

आत्महत्येची कारणे विविध आहेत. त्यात अनेक आत्महत्या या रागाच्या भरात होतात. जेव्हा व्यक्ती परिस्थितीपुढे हतबल समजू लागते तेव्हा अशा व्यक्तीची जगण्याची इच्छा संपूर्ण मरून जाते. यामध्ये व्यक्तीचा स्वत:चा ताबा काही काळासाठी निघून जातो व त्याचा परिणाम आत्महत्येसारख्या घटनेत दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सुसाइड प्रीव्हेन्शन आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ यांच्यामार्फत 2003 पासून जागतिक स्तरावर छोट्या शहरांपासून ते संपूर्ण जगात आत्महत्या या महत्वाच्या विषयावर जनजागृतीचे काम करते. आत्महत्या करण्यासाठी जेनेटिक हे देखील एक कारण आहे.

घरोघरी अन् कार्यालयांत रात्री दिवा, मेणबत्ती लावणार

जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सुसाइड प्रीव्हेन्शन आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थतर्फे सोमवारी (दि.10) रात्री 8 वाजता घरोघरी, कार्यालयात, खिडकीजवळ मेणबत्ती किंवा दिवा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्येही घरोघरी आत्महत्या केलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अन् पुढील काळात आत्महत्या होऊ नये, यासाठी मेणबत्ती व दिवा लावणार असल्याचे मानसरोगतज्ञांनी सांगितले.

संवेदनशील विषयामुळे आकडेवारी अनुपलब्ध 

आत्महत्या हा संवेदनशील विषय असल्यामुळे याचा कोणतीही संस्था सर्व्हे करत नाही. अनेक आत्महत्यांची खरी कारणे अनेकदा समोर देखील येत नाही. कुटुंबीय देखील याबाबत स्पष्ट बोलत नाही. रेल्वे, बस व इतरत्र होणार्‍या आत्महत्या अनेकदा अपघात म्हणून दाखविण्यात येतात.त्यामुळे नाशिक जिल्ह्याची कुठल्याही प्रकारची आकडेवारी उपलब्ध नाही.