होमपेज › Nashik › आणखी दोघा तरुणांची आरक्षणासाठी आत्महत्या

आणखी दोघा तरुणांची आरक्षणासाठी आत्महत्या

Published On: Aug 01 2018 1:29AM | Last Updated: Aug 01 2018 1:29AMऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

मराठा आरक्षणासाठी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दोन युवकांनी मंगळवारी आत्महत्या केल्या. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील आंदोलकांनी प्रवाशांना उतरवून एस.टी. बस जाळून टाकली. दरम्यान, परळीत ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. औसा येथे तहसील कार्यालयात आठ कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

उच्चशिक्षिताची आत्महत्या

बीड : केज (जि. बीड) तालुक्यातील विडा येथील उच्चशिक्षित अभिजित बाळासाहेब देशमुख (वय 35) यांनी सकाळी मराठा आरक्षणासाठी घराजवळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधाचा खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा केला असून, पंचनाम्यातही तसा उल्लेख आहे. अभिजित यांनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्याकडे बँकेचे कर्जही थकीत होते.

विहिरीत उडी घेतली

औरंगाबाद : आयटीआयला नंबर लागत नसल्याने फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील प्रदीप हरिदास म्हस्के या युवकाने विहिरीत उडी मारून जीवन संपविले. त्यास दहावीत 75 टक्के मार्क मिळाले होते. वैजापूर तालुक्यात पारळाजवळील मन्याड साठवण तलावात देवीदास निकम, संतोष निकम, शिवदास निकम या तीन युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

आत्मदहनाचा प्रयत्न 

लातूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी टाका (ता. औसा) येथील आठ तरुणांनी मंगळवारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्वांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. दि. 31 जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा या तरुणांनी यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला होता.