Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Nashik › ऊस उत्पादकांची अवस्था  सहनही होईना, सांगताही येईना!

ऊस उत्पादकांची अवस्था  सहनही होईना, सांगताही येईना!

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:31AM

बुकमार्क करा
सायखेडा : दीपक पाटील

निफाड सहकारी साखर कारखाना गत पाच-सहा वर्षार्ंपासून बंद असून, 2017-18 च्या गळीत हंगामातही चालू न झाल्याने तालुक्याबरोबरच ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या गोदाकाठच्या शेतकर्‍यांची आर्थिक ओढाताण होत ‘रासाका’चेही घोंगडे भिजत असून, तालुक्यात एकमेव सुरू असलेल्या केजीएस कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने, ऊस तोडला जाईल का? पेमेंट वेळेवर होईल का? आदी प्रश्‍नांनी उत्पादकांना घेरल्याने त्यांची अवस्था ‘सहनही होईना, अन् सांगताही येईना’ अशी झाली आहे.

गोदाकाठ भागात बारमाही वाहणार्‍या गोदावरीच्या पुण्याईने शेती पिके जोमात फुलू लागली आहेत. इतर पिकांबरोबरच कमी खर्चिक (तत्कालीन) असलेले ऊस हे प्रमुख पीक झाले. शिखरावर पोहोचलेल्या निफाड तालुक्यातील सहकारी साखर कारखाने सहकाराला राजकारणाच्या लागलेल्या वाळवीने बंद पडले. पूर्वी कारखाने ऊस मिळविण्यासाठी शेतकर्‍यांचे उंबरे झिजवत. मात्र, आता परिस्थिती उलटी झाली आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. 

मध्यंतरी ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळाले. मात्र, पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पुन्हा ऊस क्षेत्राकडे वळाले. सध्या तालुक्यात शेकडो हेक्टर ऊस तोडणीसाठी तयार आहे. गहू, कांदे, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसाठी ऊस क्षेत्र लवकर खाली करण्यासाठी ऊसतोड मिळावी यासाठी ऊसतोडणी मजुरांना पैसे, पार्टी देत तोडणी केली जात असूनही निम्मे नुकसान होत आहे.

उभ्या उसाचे पाचट 

निफाड तालुक्याची एकेकाळची अर्थवाहिनी तसेच जिल्ह्याबरोबरच राज्यात आपले अधिराज्य गाजवणारा, सुवर्णपदकाला गवसणी घालणारा, लाखोंचा पोशिंदा, निफाडची आन-बान-शान असलेला निफाड सहकारी साखर कारखाना चार-पाच वर्षांपासून बंद आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून ‘निसाका’ची चाके फिरणार असल्याच्या शक्यतेने ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी सद्यस्थितीला तोड मिळत नसल्याने उभ्या असलेल्या उसाचे पाचट होत आहे.

काय होतास तू, काय झालास तू..!

‘निसाका’वर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला अन् शेवटी निसाकाची धगधग थांबली. या अगोदर निसाका चालू ठेवण्यासाठी गोदाकाठ भागातील शेतकर्‍यांनी मिळेल त्या दराने निसाकाला ऊस दिला. पण, आता मात्र त्यावेळी निसाकाला ऊस न देता इतर कारखान्याला ऊस देणार्‍यांना प्राधान्य दिले जात आहे. ‘निसाका’ सुरू ठेवण्यासाठी झळ सोसणार्‍यांना कोणी वाली राहिला नसल्याने, तसेच दुसर्‍या पिकांसाठी ऊसक्षेत्र खाली करणे गरजेचे असल्याने पैसे, पार्टी देऊन तोडणी केली जात असून, ‘निसाका’ची आठवण ऊस उत्पादकांना येत आहे.