Thu, Apr 25, 2019 16:03होमपेज › Nashik › कंत्राटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला अखेर यश 

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला अखेर यश 

Published On: Jun 01 2018 12:23PM | Last Updated: May 31 2018 10:43PMनाशिक : प्रतिनिधी 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागील एक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. संबंधित ठेकेदार 306 कंत्राटी कर्मचार्‍यांपैकी पहिल्या टप्प्यात शंभर कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेऊन तर, उर्वरित कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने कामावर घेतले जाईल, असा तोडगा काढण्यात आला आहे.कंत्राटी कर्मचार्‍यांचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी आरोग्य विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.31) बैठक पार पडली. या बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, सीटूतर्फे श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, अ‍ॅड. भूषण साळवे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ प्रशासन व कामगार शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी विद्यापीठाने आंदोलनकर्त्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू करण्यास सहमती दर्शवली. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 306 पैकी शंभर कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेण्याची तयारी संबंधित ठेकेदाराने दर्शवली आहे. शिवाय उर्वरित कर्मचार्‍यांनाही टप्प्याटप्प्याने सेवेत घेतले जाईल, असा तोडगा यावेळी निघाला. त्यामुळे आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलनकर्ते उपोषण मागे घेतील, असे बोलले जात आहे. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्‍वासन फोल ठरल्याने कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी कारवाई करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत तेथील मंडप हटवला होता. मात्र, न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने कर्मचार्‍यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. या प्रकरणी जाहिरातीद्वारे खुलासा करून विद्यापीठाने हात झटकले होते. त्यामुळे आंदोलन अधिक चिघळले होते.