Sat, Jul 20, 2019 09:04होमपेज › Nashik › हरवलेली बालके सुखरूप पालकांच्या ताब्यात

हरवलेली बालके सुखरूप पालकांच्या ताब्यात

Published On: May 28 2018 1:40AM | Last Updated: May 27 2018 10:43PMनाशिकरोड : वार्ताहर

सिन्‍नरफाटा परिसरातून रविवारी (दि.27) सकाळी बेपत्ता झालेली दोन चिमुकले शिवाजी पुतळा चौकात आढळले. या बालकांना काही युवकांनी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. याच दरम्यान आपल्या मुलांचा शोध घेणार्‍या पालकांना मुले पोलीस स्थानकात असल्याचे समजताच त्यांनी तातडीने पोलीस स्थानक गाठले. पोलीस अधिकार्‍यांनी खातरजमा करून दोन्ही मुले पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

सिन्‍नरफाटा येथील विष्णूनगरमध्ये राहणारे अश्‍विन व आशिष पगारे ही अडीच वर्षाची दोन्ही बालके घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाले. बालके बेपत्ता झाल्याची बाब पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरात व नातेवाइकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाही. दरम्यान, दोन्ही बालके पायी चालत देवी चौकातून शिवाजी पुतळा चौकात आले. या मुलांबाबत नागरिक कुतुहलाने बघायला लागले. मुले रडत असल्याने परिसरातील संजय खेर व इरफान तांबोळी यांनी मुलांची विचारपूस केली. मात्र, मुलांना काहीही सांगता येत नसल्याने त्यांना नाशिकरोड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुलांकडून काही माहिती मिळत नसल्याने पोलीसही हतबल झाले. महिला पोलिसांनी या मुलांना खाऊ दिला. सकाळपासून बेपत्ता झालेले ही दोन्ही बालके दुपारी 2 पर्यंत पोलीस स्थानकात होते. बेपत्ता मुले पोलीस स्थानकात असल्याचे समजताच पालक शिवाजी पगारे व त्यांच्या नातेवाइकांनी पोलीस स्टेशन गाठले. मुलगा व भाच्याला बघताच पगारे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पोलीस निरीक्षक बिजली, सहायक निरीक्षक सोनोने, हवालदार शिंदे, राठोड, नव्हेराव, वर्पे, महिला पोलीस काजळे, वाळुंज यांनी मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तब्बल पाच तास सुरू असलेल्या बेपत्ता नाट्यावर पडदा पडला.