नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या चार विषय समित्यांसाठी गुरुवारी (दि.26) झालेल्या निवडणुकीत चारही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाची बिनविरोध निवड झाली. चारही समितीत विरोधकांपेक्षा संख्याबळ अधिक असल्याने केवळ सत्ताधारी गटातील उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले होते.
महापालिकेत 122 पैकी भाजपाचे 66 नगरसेवक आहेत. यामुळे भाजपाला इतर कुणाही पक्षाची मदत घेण्याची आवश्यकताही नाही. एकहाती सत्ता असल्याने प्रभाग समिती आणि विषय समित्यांमध्ये भाजपाचाच बोलबाला आहे. गुरुवारी महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य समिती तसेच शहर सुधारणा समिती या चार समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदाच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. गेल्या मंगळवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांचे अर्जच दाखल झाले नाही. त्यामुळे निवडणुका बिनविरोध होणार हे चित्र त्याचवेळी स्पष्ट झाले होते. केवळ घोषणा होणे बाकी होते.
महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कावेरी घुगे, उपसभापतिपदी सीमा ताजणे, विधी समितीच्या सभापतिपदी सुनीता पिंगळे, तर उपसभापतिपदी सुमन सातभाई यांची निवड झाली. वैद्यकीय व आरोग्य सभापतिपदी सतीश कुलकर्णी, तर उपसभापतिपदी पल्लवी पाटील या विराजमान झाल्या असून, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी पूनम सोनवणे आणि उपसभापतिपदी अंबादास पगारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्योतिबा पाटील यांनी काम पाहिले.
Tags : Nashik, nashik news, Subject Committee, Chairman, unopposed,