धुळे : प्रतिनिधी
राईनपाडा गावात घडलेले हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून, यातील आरोपींना मोकळे सोडले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणार्यांंवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ना. केसरकर यांनी पोरधरीच्या संशयावरून झालेल्या पाच जणांचे हत्याकांड घडलेल्या साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात भेट देऊन माहिती घेतली.
त्याच्या समवेत पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, आमदार डी. एस. अहिरे, माजी आमदार शरद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक रामकुमार आदी उपस्थित होते. यावेळी ना. केसरकर आणि जयकुमार रावल यांनी हत्याकांड घडलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थ सखाराम पवार आणि विश्वास गांगुर्डे यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना ना. केसरकर म्हणाले, सोशल मीडियाचा गैरवापर चिंताजनक असून, या माध्यमातून अफवा पसरविणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. केवळ अफवेतून पाच जणांना क्रूरपणे मारण्यात आली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. यातील कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.