Mon, Aug 19, 2019 06:00होमपेज › Nashik › कुसुमाग्रजांच्या शब्दांतूनच व्यवस्थेशी लढण्याचे बळ

कुसुमाग्रजांच्या शब्दांतूनच व्यवस्थेशी लढण्याचे बळ

Published On: Mar 11 2018 1:23AM | Last Updated: Mar 10 2018 11:52PMनाशिक : प्रतिनिधी

या वयातही चित्रपटांच्या सेन्सॉरशिपसह अन्य कोणत्याही व्यवस्थेविरोधात उभे ठाकण्याचे बळ कुसुमाग्रजांच्या शब्दांतूनच मिळते. त्यामुळे ‘गोदावरी गौरव’ हा पुरस्कार नव्हे, तर आपल्यासाठी तात्यासाहेबांचा आशीर्वादच आहे, असे भावोद‍्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी काढले. 

समाजाच्या ओंजळीत आपल्या प्रतिभेचे भरभरून दान टाकणार्‍या, अंधारलेल्या कानाकोपर्‍यांमध्ये कर्तृत्वाचा उजेड पेरणार्‍या आठ तारे-तारकांना नाशिककरांनी शनिवारी (दि. 10) कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी ‘कृतज्ञतेचा नमस्कार’ केला, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षाआड दिल्या जाणार्‍या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांचे वितरण कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले, त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना पालेकर बोलत होते. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अमोल पालेकर (नाट्य-चित्रपट) यांच्यासह मेळघाट येथील आदिवासींची वैद्यकीय सेवा करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे (लोकसेवा), ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट (चित्र-शिल्प), ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे (गायन-नृत्य), मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान-विज्ञान), मुंबई येथील कमला मिल आगीतून असंख्य लोकांना वाचविणारे पोलीस कर्मचारी सुदर्शन शिंदे व सुरक्षारक्षक महेश साबळे (क्रीडा-साहस) यांना दिमाखदार सोहळ्यात ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित करण्यात आले. 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. 

यावेळी पालेकर म्हणाले की, एरवीचे गल्लीबोळातील पुरस्कार आपण नाकारत असताना, हा पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांचा आशीर्वाद असल्याने तो स्वीकारला. नव्हे, या पुरस्काराने आपण भारावून गेलो आहोत. कुसुमाग्रज या उत्तुंग व्यक्‍तिमत्त्वाने आपल्यालाच नव्हे, तर आपल्या संपूर्ण पिढीला भरभरून दिले, संवेदना विकसित केल्या, सामाजिक बांधिलकीची जाणीव दिली. तात्यासाहेबांशी झालेल्या काही तासांच्या मोजक्या भेटींतून त्यांनी आपल्याला इतके भरभरून दिले की, दरवेळी ते पडताळून पाहत असताना नवे काही गवसते. कुसुमाग्रजांना त्यांच्या कवितांचे पदर त्यांच्यासमोर उलगडून दाखविण्याचे, ‘नटसम्राट’ हे नाटक नटाची नव्हे, तर अडगळीतील वृद्धाची कथा असल्याने ते ‘क्‍लासिक’ वाटत नाही, हे सांगण्याचे धारिष्ट्य आपण केले. मात्र, त्याबद्दल प्रत्येक वेळी कुसुमाग्रजांनी मोठ्या मनाने आपले कौतुक केले, की आपण अवाक् होऊन गेलो. चित्रपटांची सेन्सॉरशिप, राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड, बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण यासंदर्भात आपण कुसुमाग्रजांच्या ‘फक्‍त लढ म्हणा’ या शब्दांमुळेच व्यवस्थेविरोधात उभे ठाकू शकलो. 

दरम्यान, डॉ. स्मिता कोल्हे यांनी बैरागड येथील आदिवासींची संस्कृती, तेथील दारिद्य्राच्या कथा सांगत उपस्थितांना अंतर्मुख केले. सुदर्शन शिंदे यांनी त्यांची माणसांच्या मदतीला धावून जाण्यामागील प्रेरणा सांगत पोलीस दलाबाबतची नकारात्मक मानसिकता बदलण्याचे आवाहन केले. डॉ. स्नेहलता देशमुख यांनी या पुरस्कारामुळे मन भरून आल्याचे सांगत कार्यमग्‍न राहून संस्कृतीचे जतन करण्याविषयीचे विवेचन केले. सुभाष अवचट यांनी त्यांचे नाशिकशी असलेले ऋणानुबंध स्पष्ट करीत त्यांच्यातील कला फुलवण्यास आधारभूत ठरलेल्या मान्यवरांप्रति ऋणनिर्देश व्यक्‍त केले. पं. सत्यशील देशपांडे यांनी नागरिकांना सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणे ही कलावंताची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. 

महापौर रंजना भानसी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, गुरुमित बग्गा, विनायक रानडे आदींसह विश्‍वस्त व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. प्रत्येक सन्मानार्थीच्या कार्याशी सुसंगत अशा कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन प्रा. हिंगणे, मिलिंद धटिंगण, चिन्मय दीक्षित, सुखदा दीक्षित, पूनम अमृतकर यांनी केले. किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले.