Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Nashik › "आयटीआय"च्या विद्यार्थांचा ऑनलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रास्ता रोको

"आयटीआय"च्या विद्यार्थांचा ऑनलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रास्ता रोको

Published On: Feb 06 2018 5:49PM | Last Updated: Feb 06 2018 5:49PMसातपूर : प्रतिनिधी


 राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकडून  (आयटीआय) घेण्यात येणाऱ्या  परीक्षा यावर्षीपासून ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा पध्दती विरोधात सातपूर आयटीआय मधील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.


 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येते. यावर्षी संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये जिल्हास्तरावर ऑनलाईन तर, तालुकास्तरावर ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सातपूर येथील आयटीआयमध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे  प्रशासनाकडून ग्रामीण व शहरी असा दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थांनी केला आहे. 


मंगळवार सकाळी सातपूर येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत थेट रास्ता रोको करुन प्रशासनाचा निषेध नोंदवला. आयटीआयमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ८ वी, १० वी व १२ वी पास अथवा नापास इतके कमी शिक्षण असते.  या विद्यार्थांना संगणकाबाबत कमी माहिती असते. मग असे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा कशी देणार? अशी भूमिका घेत ऑनलाईन परीक्षा पद्धती बंद करून पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी  मांडली. 


आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम, प्रशांत बडगुजर, बर्डे आदींसह आयटीआयच्या शिक्षकांनी विद्यार्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र, विद्यार्थी आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. आयटीआयचे प्रशांत बडगुजर यांनी यावेळी सांगितले की, ‘‘मुंबई मुख्य कार्यालयातून ३ तारखेला पत्र प्राप्त झाले आहे. त्यात ३५ विविध ट्रेडची परीक्षा ऑनलाईन घेण्याचे आदेश आहेत. ३५ पैकी नाशिक आयटीआयमध्ये केवळ २६ ट्रेंड आहेत. पैकी २० ट्रेंडची परीक्षा ऑनलाईन  तर, उर्वरीत ६ ट्रेंडची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षा जिल्हा व तालुकास्तरावर होणार आहेत.’’
विद्यार्थांनी कायदा हातात न घेता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी गडगुरज यांनी केले.

वाहतुकीचा खोळंबा होऊ लागल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी हरीश बागुल, गणेश शिंदे, विशाल पाटील, रूपक चव्हाण, शुभम खजुल आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.