Wed, Apr 24, 2019 01:54होमपेज › Nashik › दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे घोटीत रुग्णालयावर दगडफेक

दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे घोटीत रुग्णालयावर दगडफेक

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:01AMघोटी : वार्ताहर

शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये एका दहा वर्षीय बालिकेला व नवजात शिशूला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी घडली. एकाच रुग्णालयात झालेल्या दोन मृत्यूमुळे घोटीत खळबळ उडाली असून, संतप्त जमावाने आपला राग व्यक्त करीत रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी घोटी पोलिसांनी पाच डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे गुरुकृपा हॉस्पिटल व  घोटी शहरातील इतर बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाईच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पोलिसांना दिले. रात्री उशिरापर्यंत संबंधित रुग्णालयाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे दिवसभर घोटीत तळ ठोकून बसले होते. यावेळी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून अटक करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली.

गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.19) रात्री अश्‍विनी ज्ञानेश्‍वर भोर या महिलेस प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित महिलेच्या सिझेरियन प्रसूती दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी तत्काळ संबंधित महिलेस पुढील उपचारासाठी शहरातीलच दुसर्‍या रुग्णालयात हलविल्याने या महिलेचा जीव वाचला. याचवेळी फांगुळ गव्हाणे येथील करुणा ऊर्फ कविता भगवान दुभाषे (10) या बालिकेस लघवी व शौचास त्रास होत असल्याने उपचारासाठी याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी 8 च्या सुमारास तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्या नातेवाइकांनी आरडाओरड करूनही तिला वेळेत उपचार मिळू शकला नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने तिला जीव गमवावा लागल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केली. घोटी पोलिसांनी दोन्ही प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत, मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.    

या प्रकरणात संबंधित रुग्णालयाशी संलग्न असलेल्या पाच डॉक्टरांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक आनंदा माळी व विलास घिसाडी करीत आहेत.