Sun, Jun 16, 2019 12:32
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मना-मनांत वसणारे शिवराय आता देव्हार्‍यांतही विराजमान!

मना-मनांत वसणारे शिवराय आता देव्हार्‍यांतही विराजमान!

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 1:21AMम्हसरूळ : सुधीर पेठकर

अन्यायाविरोधात एकाकी लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या, अवघ्या महाराष्ट्राच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग फुलवणार्‍या छत्रपती शिवरायांविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहेच. मात्र, काही शिवप्रेमींनी घरातील देव्हार्‍यात शिवरायांच्या प्रतिमेचा समावेश करीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ही नवी परंपरा चर्चेचा विषय ठरली आहे. 

घरोघरच्या देव्हार्‍यांत विविध देवी-देवतांच्या प्रतिमा ठेवून त्यांचे पूजन करण्याची परंपरा रूढ आहे. बहुतांश मराठी घरांच्या देव्हार्‍यांत टाक असतात. त्यांत जेजुरीचे खंडेराय, ग्रामदेवता, भैरवनाथ तथा भैरोबा, कुलदेवता आदींचा समावेश असतो. मात्र, आतापर्यंत शिवप्रेमींच्या हृदयमंदिरात असलेल्या शिवरायांना काही मावळ्यांनी थेट देव्हार्‍यात विराजमान केले आहे. अन्य देवतांसह छत्रपतींचाही टाक  बनवून त्याचे नित्यनेमाने पूजन केले जात आहे. चांदीच्या पत्र्यावर कोरलेली शिवरायांची प्रतिमा व मागील बाजूने तांब्याचा पत्रा लावलेले हे टाक लक्ष वेधून घेत आहेत, तसेच शिवप्रेमींच्या आदरभावनेचे दर्शनही घडवत आहेत. शहरातील काही घरांमध्ये हे टाक देव्हार्‍यांमध्ये विराजमान असून, ते चर्चेचा विषय ठरत आहेत. 

शिवप्रेमींच्या देव्हार्‍यांमध्ये प्रतिमारूपात विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शहरातील दिंडोरी रोड येथे मंदिरही उभारण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त या मंदिरात सोमवारी (दि.19) प्रतीकात्मक शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, नगरसेवक गणेश गिते, नगरसेवक पूनम धनगर, माजी नगरसेवक शालिनी पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

परशुराम प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती राहुल पवार व किरण काकड यांनी दिली. दरम्यान, म्हसरूळ ग्रामस्थांतर्फे शिवजयंतीनिमित्त सोमवारी (दि.19) मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुख्य बसस्थानकासमोरून सकाळी 9 वाजता शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व आरती होणार आहे. सायंकाळी 4 वाजता आरटीओ कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व तेथून म्हसरूळ गाव अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात ढोल-ताशा पथक व मर्दानी खेळ प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.