Tue, Mar 19, 2019 09:34होमपेज › Nashik › मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या : दानवे

मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या : दानवे

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चांगले काम करत आहेत. यामुळे त्यांच्या बदलाच्या केवळ वावड्या आहेत. त्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, अशा प्रकारची स्तुतिसुमने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली. परंतु, नाशिकमधील विविध प्रकल्प राज्य शासनाकडून नागपूरला नेले जात असल्याबाबत मात्र त्यांनी चुप्पी साधत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. 

भाजपाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आयोजित बैठकीसाठी ते मंगळवारी (दि.14) नाशिकला आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. परंतु, 2024 मध्ये होणार्‍या निवडणुका एकत्रित घ्याव्यात याबाबत काम सुरू आहे. वेळेचा अपव्यय टाळावा आणि विकासकामांना पुरेसा अवधी मिळावा. या दृष्टिकोनातून एकत्रित निवडणुका घ्याव्यात असे आपले मत आहे. विविध निवडणुकांचा विचार केला तर चार ते पाच वर्षातील जवळपास 357 दिवस हे आचारसंहितांमुळे वाया जात असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. आगामी निवडणुका मुदतीतच होतील. तसेच, अद्याप एकत्रित निवडणुका घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या अनेक प्रकारचे सर्वेक्षण हे भाजपाविरोधी दर्शविले जात आहेत. गुजरात, कर्नाटक, गोवा, नागालॅण्डमधील निवडणुकांचे सर्वेक्षणही असेच दाखविले जात होते मात्र काय झाले? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात तेच काम करत आहेत. आमचे लक्ष्य केवळ विकास हेच आहे. विरोधक विरोधकांचे काम करत आहे. त्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. बाहेरच्या पैशांवर आमच्या पक्षाचे काम चालत नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर टीका केली. पत्रकार परिषदेस खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, लक्ष्मण सावजी, सुनील बागूल, दादाजी जाधव आदी उपस्थित होते.