होमपेज › Nashik › कांदा व्यापार्‍यांना गंडवणारा श्रीलंकेतील संशयित गजाआड

कांदा व्यापार्‍यांना गंडवणारा श्रीलंकेतील संशयित गजाआड

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:42AMनाशिक :

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांसोबत व्यवहार करून त्यांना लाखो रुपयांना गंडवणार्‍या श्रीलंकेतील संशयितास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) असे या संशयिताचे नाव आहे. त्यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.20) पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ऑगस्ट 2017 मध्ये आडगाव पोलीस ठाण्यात प्रवेश पवनकुमार कोचेटा (25, रा. औरंगाबाद रोड, नाशिक) यांनी या प्रकरणी संशयित विजयकुमार चंद्रशेखर (रा. सेलम, राज्य तामिळनाडू) आणि ससिगरन नागराज (रा. श्रीलंका) या दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. प्रवेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी संगनमत करून साईपादुका एक्सपोर्ट नावाने फर्म स्थापन केली. मात्र, या कंपनीत ससिगरण हा भागिदार नसतांनाही तो कंपनीचा भागिदार असल्याचे भासवले. त्यानंतर मार्च 2017 मध्ये संशयितांनी जिल्ह्यातील व्यापार्‍यांना कांदा व कांदा भरण्यासाठी लागणार्‍या ज्यूटचे व्यापारी असल्याचे सांगितले. तसेच, प्रवेश व इतर शेतकर्‍यांकडून 74 लाख 14 हजार 681 रुपयांचे कांदा व ज्यूट पोती खरेदी केली. मात्र, संशयितांनी या खरेदीचे पैसे शेतकरी व व्यापार्‍यांना दिलेच नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्‍त विजयकुमार मगर, सहायक आयुक्‍तभागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. श्रीलंकेतील संशयित नागराज याच्याविरोधात लुकआऊट नोटीस पाठवून सर्व विमानतळावर त्याची माहिती दिली. तसेच, तामिळनाडू पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला होता. 14 जुलैला तामिळनाडूतील मदुराई पोलिसांनी विमानतळावरून नागराज यास पकडले व त्याची माहिती नाशिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तामिळनाडू येथे जाऊन नागराज याचा ताबा घेतला. न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत (दि.20) पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काकड, हवालदार दिलीप औटी, पोलीस शिपाई शिवाजी कुलकर्णी यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.