Mon, Aug 19, 2019 07:15होमपेज › Nashik › अर्थव्यवस्थेची चाके पंक्‍चर : पी. चिदंबरम

अर्थव्यवस्थेची चाके पंक्‍चर : पी. चिदंबरम

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी

गुंतवणूक, निर्यात, देशांतर्गत खप आणि सरकारचा खर्च या चार चाकांवर देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी सुरळीत धावत असते. मात्र, सध्याच्या केंद्र सरकारच्या कारभारामुळे या गाडीची अन्य तिन्ही चाके पंक्‍चर झाली असून, पंतप्रधानांच्या रोड शोसाठीचा सरकारी खर्च मात्र वाढत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील गुंतवणूक व नोकर्‍या संपल्याचा आरोपही त्यांनी केला. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित विशेष चर्चासत्रात ते शनिवारी (दि. 7) बोलत होते. ‘आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक, रोजगार नाही’ या विषयावर (पान 1 वरून) त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले व आकडेवारीच्या आधारे देशातील सद्य आर्थिक स्थितीवर संयत भाषणाद्वारे प्रकाश टाकला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे, राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्याला इंग्रजीत बोलावे लागत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करीत चिदंबरम यांनी भाषणाला सुरुवात केली.

मी भूतकाळ व वर्तमानकाळाबद्दल नव्हे, तर भविष्यकाळाबद्दल आपल्याशी संवाद साधणार असल्याचे सांगत ते म्हणाले, भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला अधिक चांगले जीवनमान मिळावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. देशाचे उत्तम भविष्य हे गुंतवणूक व नोकर्‍या या दोन गोष्टींवर अवलंबून असते, कोणा मोदी वा शाह यांच्यावर नव्हे. पाश्‍चात्त्य देशांनी गुंतवणूक व नोकर्‍यांचे महत्त्व जाणल्याने त्यांचा विकास झाला. गुंतवणुकीतून नोकर्‍या, नोकर्‍यांतून अधिक उत्पन्न, उत्पन्नातून भांडवल निर्मिती व त्यातून गुंतवणूक असे आर्थिक चक्र असते. आपल्या देशात हे चक्र बिघडल्याने आर्थिक स्थिती ढासळत आहे.

6 ते 7 वर्षांपूर्वी देशातील सार्वजनिक गुंतवणूक विकासदराच्या 34 टक्के इतकी होती, ती आता 28 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. देशाचे अर्थमंत्री याबद्दल काही बोलत नाहीत आणि जे बोलतात त्या रघुराम राजन, पनगढिया, सुब्रह्मण्यम यांसारख्या अर्थतज्ज्ञांना देश सोडावा लागतो. आज लोकांकडे भांडवल नाही, बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. कोणाला मोठे कर्ज मंजूर केले की, बँकेच्या मॅनेजरला नोकरी जाण्याची भीती वाटते. बँकांचा एनपीए 2 लाख 63 लाख कोटींवरून 11 लाख कोटींवर पोहोचण्यास जबाबदार कोण, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला. 

संपुआ सरकारच्या काळात देशाचा विकासदर 8.4 टक्के इतका सर्वाधिक उंचीवर गेला होता. 40 कोटी लोक दारिद्य्ररेषेबाहेर आले होते. मात्र, आता गेल्या अनेक महिन्यांपासून नव्या नोकर्‍या निर्माण होणे पूर्णत: थांबले आहे. दुसरीकडे सरकार मात्र 70 लाख नव्या नोकर्‍या निर्माण केल्याचा दावा करीत आहे.  पोरधरी समजून व गोधनाची वाहतूक केल्याच्या संशयातून 90 लोकांना ठेचून मारण्याच्या घटना देशात गेल्या महिनाभरात घडल्या. गरीब, अर्धशिक्षित व बेरोजगार माणसांनी ही हिंसा केल्याचे समोर आले आहे. देशात तब्बल 3.5 कोटी लोकांना नोकरीची गरज आहे.

मात्र, नोटाबंदी व जीएसटीने अनेकांना उद्ध्वस्त केले आहे. एकट्या तमिळनाडूत 15 हजार उद्योग बंद पडून 5 लाख लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार संपला नाही, काळा पैसा हाती लागला नाही, बनावट नोटांना आळा बसला नाही, मग नोटाबंदीतून सरकारने नेमके साधले काय, असा प्रश्‍न चिदंबरम यांनी  केला. जीएसटीला भाजपाने 2014 पर्यंत कडाडून विरोध केला आणि स्वत:चे सरकार आल्यावर त्याचीच चुकीची अंमलबजावणी केली. सिंगापूर, मलेशियापासून अनेक देशांत जीएसटीचा एकच दर आहे. आपल्याकडे मात्र आठ टप्पे करण्यात आले आणि त्यावर टीका केल्यावर दूध आणि मर्सिडीजला समान कर कसा लावायचा, असे विचारले गेले.

दुधावर कर लावूच नये, ही साधी गोष्ट सरकारला कळत नाही. आर्थिक सल्लागार अरविंद पनगढिया यांच्या शिफारशींना केराची टोपली दाखविण्यात आली. जीएसटीमुळे फक्‍त देशातील सनदी लेखापालांचा फायदा झाला. 2014 मध्ये 314 बिलियन डॉलर असलेली देशाची निर्यात घटून 262 बिलियन डॉलर्सवर पोहोचली होती. गुंतवणूक, निर्यात, देशांतर्गत खप या सर्वांत घट झाली आणि पंतप्रधानांच्या रोड शोवरील सरकारी खर्च मात्र वाढला. तिन्ही चाके पंक्‍चर झाल्यावर कारची जशी अवस्था होते, तशी अवस्था सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची झाली असल्याचेही ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर तुम्हा सर्वांचे भवितव्य तुमच्या हाती असून, मतदानाच्या छोट्याशा कृतीतून तुम्ही देशाची लोकशाही व पुढची पिढी वाचवा, असे आवाहनही चिदंबरम यांनीकेले. 

दरम्यान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार सुधीर तांबे, डॉ. शोभा बच्छाव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. हेमलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तुषार शेवाळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, जयप्रकाश छाजेड, माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, आमदार निर्मला गावित, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

बँकिंग क्षेत्र कोलमडले : चव्हाण

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका करताना शेतकरी आत्महत्या, इंधन दरवाढ, बेरोजगारी आदी अनेक मुद्यांना स्पर्श केला. देशातील बँकिंग क्षेत्र कोलमडले असून, त्यांतील निर्णयप्रक्रिया ठप्प झाली आहे. बँका 6-6 महिने कर्ज मंजूर करीत नसल्याने सर्वसामान्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. देशात राहायचे असल्यास आमचीच विचारधारा मान्य करावी लागेल, असा सरकारचा आग्रह आहे. प्रत्येक गोष्टीवर पाळत ठेवली जात असल्याने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

.. तर देशात यादवी युद्ध : न्या. ठिपसे

तीस वर्षे न्यायदानाचे कर्तव्य बजावल्यानंतर आपण विचारपूर्वक काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर बोलत असल्याचे न्या. अभय ठिपसे म्हणाले. सध्या देशात आक्रम सांस्कृतिक दहशतवाद वाढत असून, विशिष्ट विचार मान्य नसल्यास देशातून चालते व्हा, असा उन्माद जातीयवादी शक्‍तींमध्ये संचारला आहे. या जातीयवादी शक्‍ती लोकशाहीसाठी घातक असून, याच विचारांचे सरकार पुन्हा निवडून आल्यास देशात यादवी युद्धाची स्थिती निर्माण होईल, अशी भीती न्या. ठिपसे यांनी व्यक्‍त केली.

पुण्य पणाला लागणार : केतकर

सन 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे काय होईल, हा प्रश्‍न सध्या देशात चर्चिला जात असला, तर त्यापेक्षा देशाचे काय होईल, हा प्रश्‍न गहन असल्याचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले. या देशाची बहुप्रांतिक ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून, देशातील धार्मिक विद्वेष वाढविण्याची अमेरिकेसह पाकिस्तान व अन्य राष्ट्रांचीही चाल आहे. काँग्रेसमध्येही अनेक दुर्गुण असले, तरी सांस्कृतिक एकात्मतेचा आग्रह हा या पक्षाचा सर्वोत्तम सद‍्गुण आहे. या देशाची धर्मनिरपेक्षतेची ओळख काँग्रेसने कधीच पुसू दिली नाही. हे पुण्य 2019 मध्ये पणाला लागणार असल्याचेही ते म्हणाले.