Thu, Apr 25, 2019 12:26होमपेज › Nashik › सोनई हत्याकांड : ६ आरोपींना फाशीची शिक्षा

सोनई हत्याकांड : ६ आरोपींना फाशीची शिक्षा

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 12:11AMनाशिक : प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोनई हत्याकांडात दोषी ठरविण्यात आलेल्या, सहाही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी शनिवारी (दि.20) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

‘दुर्मिळातील दुमिर्र्ळ’ अशी ही घटना असून, जातीयवाद ही समाजाला लागलेली कीड आहे. ती एड्स या रोगासारखी पसरू नये, तसेच आरोपींना मोकळे सोडणे म्हणजे हिंस्त्र लांडग्याला समाजात मोकळे सोडण्यासारखे होईल, असे परखड मत न्यायाधीशांनी निर्णय देताना व्यक्‍त केले. 

पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुर्‍हे, अशोक सुधाकर नवगिरे अशी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. अशोक रोहिदास फलके (40, रा. लांडेवाडी, सोनई, ता. नेवासा) हा निर्दोष मुक्त झाला.

आरोपींच्या घरातील मुलीचे सचिन घारू याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मुलीचे परजातीच्या मुलासोबत प्रेम असल्याची कुणकुण लागताच आरोपींनी 1 जानेवारी 2013 रोजी नगर जिल्ह्यातील सोनई येथे दरंदले वस्तीवर सचिन सोहनलाल घारू (23), राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (26) आणि संदीप राजू थनवार (24) या तिघांची संगनमत करून कट रचून निर्घृण हत्या केली होती. दोन्ही पक्षकारांचा युक्‍तिवाद ऐकून जिल्हा न्यायालयाने सोमवारी (दि.15) सातपैकी सहा आरोपींना  दोषी ठरवले होते. तर अशोक फलके याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता केली. त्यानंतर गुरुवारी (दि.18) शिक्षेवर झालेल्या युक्‍तिवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने काल (दि.20) निकाल दिला. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर घारू, कंडारे आणि थनवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्‍त केले. 

न्यायाधीश वैष्णव यांनी शिक्षा सुनावताना सांगितले की, आरोपींचा सहभाग सिद्ध झाला आहे. त्यांनी कट रचून तिघांची निर्घृण हत्या केली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. जातीभेदाच्या द्वेषात आरोपी अंध झाले, मानवी मूल्ये विसरत ही घटना केली.

माणूस जन्माने मोठा नसतो, तर त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. जातीपातीच्या भेदात आरोपी अंध झाले. दुसर्‍यांबद्दल संवेदना ठेवतो तोच उच्च जातीचा माणूस असतो. प्रत्येक व्यक्‍ती दुसर्‍याने केलेल्या कृत्यात तेवढाच जबाबदार असतो. म्हणून अशोक नवगिरे हा त्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही. हा गुन्हा जातीयतेच्या मानसिकतेतून घडला आहे. त्यामुळे तीन तरुणांचा हकनाक बळी गेला आहे. तुम्ही आरोपी मानवी शरीर धारण केलेले सैतान आहात, असा निष्कर्ष निघतो.

जातीयतेच्या कारणातून निष्पाप तरुणांची हत्या केली. तुम्हाला मोकळे सोडले तर हिंस्त्र लांडग्याला समाजात मोकळे सोडल्यागत होईल. त्यामुळे तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे. जातीयवाद ही समाजाला लागलेली एचआयव्हीसारखी कीड आहे. त्याची परिणती एड्ससारख्या रोगात होऊ नये. याचा परिणाम सामाजिकतेवर होतो. आरोपींनी केलेल्या कृत्यामुळे सामाजिक भावनेला जबरदस्त धक्का बसला आहे. दोन कुटुंबातील वाद म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही हत्या नाही तर सामाजिक द्वेषातून समाजावर केलेला हल्ला आहे. 

आरोपींनी बचाव करताना सांगितले की, ते तरुण आणि वृद्ध आहेत. मात्र, त्या तिघा तरुणांचाही विचार आरोपींनी केला नाही. ज्या तीन तरुणांची हत्या झाली त्यातील दोघे अविवाहित होते, तर एकाची आई वृद्ध आहे, असेही मत न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

जप्त वस्तूंचा लिलाव करा...

गुन्ह्यात जप्‍त केलेली एमएच 17 एपी 8369 क्रमांकाची दुचाकी, तसेच तिघा मृत युवकांचे मोबाईल, सीमकार्ड त्यांच्या कुटुंबीयांना परत द्यावे. त्याचप्रमाणे सहा आरोपींचे मोबाईल फोन आणि सीमकार्डचा जाहीर लिलाव करून, त्यातून आलेली रक्कम सरकारजमा करावी. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांचाही जाहीर लिलाव करून त्यातून आलेली रक्कम सरकारजमा करावी. कलम 115(अ) नुसार आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा हक्क आहे. नाशिकच्या जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाने मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई भेटावी यादृष्टीने चौकशी करावी, असे न्यायालयाने सुनावले आहे.

जातीयवाद्यांच्या मनात धडकी भरेल

दुर्मिळातील  दुमिर्र्ळ  असा हा गुन्हा आहे. या खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून गुन्हा  सिद्ध करण्यात आला. जात व धर्म याचा खोटा अहंकार बाळगणार्‍या समाजातील ठेकेदारांच्या उरात धडकी भरविणारा हा निर्णय आहे. या हत्येचे वर्णन करायलादेखील शब्द अपुरे आहेत. शेक्सपिअरचा हॅम्लेटदेखील ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या विंवचनेत पडला असता. जात व्यवस्थेवर विश्‍वास ठेवून तिघांची हत्या करणार्‍यांना या समाजात राहण्याचा मुळीच हक्क नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले. जातीवर भांडवल केले जाते, द्वेष निर्माण केला जातो, याची दखल न्यायालयाने निकालपत्रात घेतली. अशा प्रवृत्तीच्या लोकांबद्दल न्यायालयाने कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे.  - अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

अशी सुनावली शिक्षा... 

सहा आरोपींना भारतीय दंडसंहितेच्या 120-ब च्या कलम 302 आणि फौजदारी दंडसंहितेच्या कलम 235(2)च्या नुसार दोषी ठरवण्यात येऊन त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि फौजदारी दंडसंहितेच्या 354(5) तसेच कलम 366 नुसार सर्व आरोपींना मरेपर्यंत फाशी सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींना सात वर्षे सक्‍तमजुरी आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन वर्षांची अतिरिक्‍त शिक्षा सुनावण्यात आली. वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतील प्रत्येकी 20 हजार रुपये मृतांच्या वारसांना देण्यात यावेत. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात निर्दोष सोडलेल्या अशोक रोहिदास फलके यास फौजदारी दंडसंहिता कलम 437(अ) नुसार 25000 रुपयांच्या वैयक्‍तिक जातमुचलक्यावर न्यायालयाला हमी द्यावी लागणार आहे. 

निकालावर मृतांचे नातेवाईक समाधानी

सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहा आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने काल फाशीची शिक्षा सुनावली. अत्यंत निर्घृणपणे हे खून करण्यात आल्याने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मृतांच्या नातेवाईकांची मागणी होती. त्यामुळे निकालानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

सचिनची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने आनंद झाला आहे. मात्र, आता आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. माझा निर्दोष मुलगा मारला गेला याचे दु:ख आहे. पाच वर्षांनंतर मला न्याय मिळाला आहे, असे मृत सचिनची आई कलाबाई घारू यांनी सांगितले.

न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास होता. सीआयडी तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे आभार मानतो. न्यायालयाने दिलेला हा निकाल समाजातील जातीय व्यवस्थेचे उच्चाटन करणारा ठरणार आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला,  अशी प्रतिक्रिया मृत संदीपचा भाऊ पंकज थनवार यांनी दिली.

माझा भाऊ हकनाक मारला गेला. न्यायालयाच्या निकालाने माझ्या भावाच्या आत्म्यास शांती मिळेल. आता आरोपींना लवकर फाशी द्यावी. ज्या दिवशी त्यांना फाशी मिळेल, त्याच दिवशी माझ्या भावाला पूर्ण न्याय मिळेल, अशी भाविनक प्रतिक्रिया मृत सचिनची बहीण रिना अटवाल यांनी दिली.

आरोपी उच्च न्यायालयात ज्यावेळी दाद मागतील, त्यावेळी उच्च न्यायालयदेखील आरोपींना फाशीचीच शिक्षा सुनावेल, असा मला विश्‍वास आहे. माझ्या भावाला मारणारे राक्षस समाजाला लागलेली कीड आहे. सरकारी मदत अद्याप आम्हाला मिळालेली नाही, असे मृत राहुलचा भाऊ सागर कंडारे यांनी सांगितले.

न्यायालयीन आवारात गर्दी 

बहुचर्चित खटल्याचा निकाल असल्याने पोलिसांनी न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आरोपींच्या नातलगांनी शिक्षा सुनावल्यानंतर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव घातल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.