Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Nashik › सहगल यांच्या भाषणाची सभा उधळली

सहगल यांच्या भाषणाची सभा उधळली

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:32AM
नाशिक : प्रतिनिधी

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्यात आले असताना, त्याविरोधात शहरात बोलावण्यात आलेल्या सहगल यांच्या भाषणाची अभिवाचन सभाही काही कार्यकर्त्यांनी उधळून लावली. या सभेत ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते आयोजकांकडून अचानक रद्द करण्यात आले. ही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे सांगत याचा राज्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. नाशिकमध्येही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य रक्षण निर्धार मंच या संघटनेतर्फे नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 11) कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अरुण ठाकूर यांनी भूमिका मांडल्यानंतर दीपा पळशीकर यांनी सहगल यांच्या संपूर्ण भाषणाचे वाचन केले.

त्यानंतर किशोर पाठक, विश्‍वास ठाकूर, चंद्रकांत महामिने यांनी मनोगत व्यक्‍त केले. तेवढ्यात समीर देव हे बोलण्यास उभे राहिले. त्यांनी प्रारंभी सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा निषेध व्यक्‍त करीत ‘सहगल यांनी साहित्यिक व्यासपीठावर राजकीय भाषण करणे योग्य नव्हते’ असा वेगळा सूर लावला. नक्षलवाद्यांना साथ देऊन देशविरोधी कार्य करणार्‍या पाच व्यक्‍तींना सहगल निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र कसे देऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताला तीन-चार व्यक्‍तींनीच स्वातंत्र्य मिळवून दिले, असे आजही मानले जाते, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यावर त्यांना मनोहर अहिरे यांच्यासह काही जणांनी थांबविण्याचा प्रयत्न करीत ‘हा या सभेचा विषय नव्हे’ असे समजावले. मात्र, देव यांनी आपल्याला बोलू देण्याचा आग्रह सुरूच ठेवला. त्यावर लोकेश शेवडे यांनी त्यांच्याकडून ठराव मांडण्यासाठी माइक मागून घेतला. यावेळी ही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप करीत अन्य दोन कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभेत एकच गोंधळ निर्माण झाला. अखेर संबंधित कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर नेण्यात आले व निषेधाचा ठराव मांडून सभेचा समारोप करण्यात आला.