Sat, Jun 06, 2020 07:48होमपेज › Nashik › मच्छरदाणीत बालकांसोबत झोपला बिबट्या

मच्छरदाणीत बालकांसोबत झोपला बिबट्या

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 1:24AMघोटी : प्रतिनिधी

धामणगाव (ता. इगतपुरी) येथे एका कुटुंबात आज एक नवा पाहुणा बालगोपाळांसोबत चक्‍क मच्छरदाणीत जाऊन झोपला. या पाहुण्याला अचानक पाहताच मात्र सर्वांची अक्षरशः त्रेधातिरपीठ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. 14) पहाटे 4 वाजता उघडकीस आली. हा पाहुणा दुसरा तिसरा कुणी नसून बिबट्याचा तीन महिन्याचा बछडा आहे. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सहकारी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात याच गावात विहिरीत बिबट्या पडला होता. 

तर दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या झोपडीत सापडला होता. दरम्यान, बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले असून, वनखात्याने आवश्यक उपाय करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. धामणगाव येथे मनीषा बर्डे यांचे आदिवासी कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास 

दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेला बिबट्याचा बछडा घरात घुसला. याबाबत त्यांना समजलेच नाही. घरात बर्डे यांचे दोन मुले मच्छरदाणी पांघरूण झोपलेले होते. बिबट्याच्या बछड्याने त्यांच्या मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश करून तो झोपी गेला. पहाटे 4 वाजता मनीषा बर्डे यांन या आगंतुक पाहुण्याची चाहूल लागल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तत्काळ गावकर्‍यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना संपर्क करून माहिती दिली. इगतपुरीचे वन परिक्षेत्राधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन वन परिमंडळ अधिकारी जाधव यांनी वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्यासह धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. कमी वयाचा बछडा असला तरी लहान बालकांना इजा करण्याइतपत त्याच्यात क्षमता असली तरी बालके सुरक्षित आहेत. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात बिबट्या दिसण्याचे आणि सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत. वन परिमंडळ अधिकारी जाधव यांनी बिबट्या मारून तस्करी करणारी टोळी उघडकीस आणली होती. यासह अनेक घटनांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.

बिछान्यात बिबट्याचा बछडा असल्याचे समजताच 15 मिनिटांत दखल घेऊन त्याला ताब्यात घेतले. बिबट्या मानवी जीवनासाठी घातक नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी यांनी केले आहे.