Wed, Aug 21, 2019 19:17होमपेज › Nashik › चांदवडच्या सहा पाझर तलावातील पाणी दूषित

चांदवडच्या सहा पाझर तलावातील पाणी दूषित

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:39PMचांदवड : वार्ताहर

जैतापूर (ता. चांदवड) येथील गोंगलू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फूड प्रोसेसिंग कंपनीतील खराब पाणी कंपनीच्या परिसरात सोडले जात असल्याने छोट्या-मोठ्या तब्बल सहा तलावातील पाणी पूर्णतः दूषित होऊन काळवटले आहे. हे काळवटलेले पाणी नागरिकांनी सेवन केल्यास आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत दह्याणेच्या सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित कंपनी, शासकीय अधिकार्‍यांना निवेदने देऊनदेखील अद्याप संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.

तालुक्यातील जैतापूर येथे गोंगलू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फूड प्रोसेसिंग कंपनीत विविध फळांवर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान निघणारे खराब पाणी कंपनीने बाहेर काढून दिले आहे. हे पाणी वाहत छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना मिळते. सध्या, पाऊस सुरू असल्याने हे पाणी वाहत वाहत जांबुटके धरणापर्यंत जात आहे. जांबूटके धरणातून परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणातील खराब पाणी सेवन करून नागरिकांना काही त्रास झाला तर त्यास जबाबदार कोण हा मुद्दा हेरून दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती भवर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अ‍ॅड. शांताराम भवर, उपसरपंच मंदाकिनी केदारे, मुकुंद भवर, उमेश नागरे, अंबादास इंमले, संपत सोनवणे यांनी संबंधित कंपनीने खराब पाणी बाहेर सोडू नये, याबाबत कंपनी, चांदवडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, विस्तार अधिकारी सुनील पाटील, ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी कंपनीच्या परिसराची पाहणी केली. मात्र, अद्यापही कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे संबंधित गोंगलू कंपनीतून खराब पाण्याचा सुरू असलेला विसर्ग अद्यापही सुरूच आहे. यामुळे कंपनीच्या परिसरातील तब्बल छोट्या-मोठ्या सहा पाझर तलावातील पाणी हे खराब झाले असून, ते पूर्णतः काळवटले आहे. या खराब पाण्यामुळे समजा कोणालाही दुखापत झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.