Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Nashik › अबब! विद्यार्थ्यांना सहा ग्रॅम दूध भुकटी

अबब! विद्यार्थ्यांना सहा ग्रॅम दूध भुकटी

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:08AMनाशिक : प्रतिनिधी

शालेय पोषण आहारामध्ये दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला असून, त्यानुसार एका विद्यार्थ्याला एका दिवसाला सहा ग्रॅम दूध भुकटी मिळणार आहे. सरकारने ‘सढळ’ हाताने देऊ केल्याने या योजनेमुळे गरिबांची मुले ‘सुदृढ’ हाण्यास मदत होणार आहे.

दुधाला योग्य दर मिळावे यासाठी मध्यंतरी आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. दूध भुकटीला चालना देणे हा याच उपाययोजनांचा एक भाग मानला जात आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात दूध भुकटी तयार असून, या भुकटीला उठाव मिळाला तर दुधालाही योग्य दर मिळेल, असा सरकारचा अंंदाज आहे. त्याचमुळे दूध भुकटीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एका विद्यार्थ्याला एका महिन्याला दोनशे ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट दिले जाणार आहे. दूध भुकटी दिवस आयोजित करून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत तीन महिन्यांसाठी सहाशे ग्रॅमची पाकिटे वितरित करण्याचे आदेश आहेत. प्रत्यक्षात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार याविषयी मात्र साशंकता आहे. 23 ऑगस्टला सरकारचा आदेश निर्गमित करण्यात आला असला तरी दूध भुकटी पुरवठा करण्यासंदर्भात अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत.

दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून लाभार्थी नेमके किती, याविषयी माहितीच मागविण्यात आलेली नाही.  जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे साडेचार लाख तर सहावी ते आठवीचे अडीच लाख विद्यार्थी पोषण आहाराचे लाभार्थी आहेत. एका विद्यार्थ्याला महिन्याला दोनशे ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट दिल्यानंतर दूध तयार करणे आणि पिणे हे काम मात्र घरीच  करावयाचे आहे. महिन्याला दोनशे ग्रॅम भुकटी तर एका दिवसाला सहा ग्रॅम दूध भुकटी एका विद्यार्थ्याला मिळणार आहे. त्यापासून नेमके किती दूध तयार होईल, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही. आता सहा ग्रॅम दूध भुकटी पहिलीच्या सहा वर्षांच्या विद्यार्थ्यासाठी आणि आठवीच्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासाठी पुरेशी आहे का, याबाबत तज्ज्ञांनीच शंका व्यक्त केली आहे. एका विद्यार्थ्याला दर दिवसाला किमान 15 ग्रॅम तरी दूध भुकटी मिळाली तरच दूध प्यायलाचे समाधान संबंधित विद्यार्थ्याला लाभेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे दूध भुकटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असल्याने दूध भुकटीच्या प्रमाणात भविष्यात वाढ होऊ शकते, असेही सांगण्यात आले.