Fri, May 24, 2019 09:02होमपेज › Nashik › वंजारी मैदानाचा वाद न्यायालयात जाणार

वंजारी मैदानाचा वाद न्यायालयात जाणार

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:26AMसिन्‍नर : प्रतिनिधी

समाजाच्या विधायक कामाला विरोध नाही. मात्र, सिन्‍नर शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले वंजारी समाजाचे मैदान  एक शैक्षणिक संस्थेला देण्याचा घाट काही विश्‍वस्तांनी घातला आहे. तालुक्यातील वंजारी समाज बांधवांना विश्‍वासात न घेता विश्‍वस्तांनी परस्पर निर्णय घेतला आहे. या निर्णयाला तालुक्यातील वंजारी समाज बांधवांचा विरोध असून, या प्रकरणी न्यायालयात जाण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले. शहरातील गोदावरी लॉन्स येथे  संघर्ष समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वंजारी समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, सुदाम बोडके, छगन आहेर, अशोक आव्हाड, लक्ष्मण सांगळे, अ‍ॅड. शंकर कर्पे, अ‍ॅड. नीलेश सानप, गोपाळ बर्के, भारत दिघोळे, रवींद्र काकड आदी उपस्थित होते.  आडवा फाटा येथील वंजारी समाजाची जागा मुंबईत असणार्‍या वंजारी हमाल बांधवांनी खरेदी केली होती.

विद्यमान विश्‍वस्तांनी जागा खरेदीसाठी घरातून पैसे आणले नव्हते. वंजारी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक परवड थांबविण्याचा उद्देश जागा खरेदी करण्यामागचा होता. मात्र, साधारणत: शंभर वर्षात आपल्याला या जागेवर एक वीटही उभारता न येणे हे दुर्भाग्य आहे. तीच परिस्थिती नाशिकच्या मैदानाची आहे. मैदानावर केवळ तमाशाचे फड रंगणे एवढीच प्रगती असल्याची खंत आव्हाड यांनी व्यक्त केली. गोंधळाचे भाकित वर्तवित   काही समाजबांधवांनी मेळाव्याला न येण्याची विनंती केली होती. मी एकट्याच्या जिवावर राजकारण करतो. सिन्‍नरच्या राजकारणात रस नसून केवळ समाजाच्या अस्मितेसाठी आलो आहे. वंजारी मैदानाचा लढा संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे सांगत सिन्‍नरकरांच्या लढ्यासाठी 11 लाख देण्याची घोषणा आव्हाड यांनी  केली.