Wed, Apr 24, 2019 19:34होमपेज › Nashik › कर्ज वसुली पथकावर हल्ला, माय-लेकाने घेतले विष!

वसुली पथकावर हल्ला, माय-लेकाने घेतले विष!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्‍नर : प्रतिनिधी

सिन्‍नर तालुक्यातील पांढुर्ली येथे थकीत कर्ज वसुलीसाठी आलेल्या पथकाला विरोध करण्यासाठी शेतकरी महिलेसह तिच्या मुलाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.25) घडली. सुलोचना मुकुंद वाजे (52) व कैलास मुकुंद वाजे (33) अशी माय-लेकाची नावे असून, त्यांच्यावर देवळाली कॅम्प येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  वसुली पथकावर संबंधित कर्जदार शेतकरी कुटुंबाने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली.

या घटनेत  वसुली पथकाच्या इनोव्हा कारची काच फुटली असून, याबाबत पांढुर्ली शाखेचे व्यवस्थापक दिलीप बापू दळवी (53) यांनी सिन्‍नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जिल्हा बँकेने मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर थकबाकीदारांकडे वसुलीचा तगादा लावला आहे. नियमित कामाचा भाग म्हणून जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील अधिकार्‍यांसह पांढुर्ली शाखेचे व्यवस्थापक दळवी, सचिव किरणगिर गोसावी आदींचे वसुली पथक कर्जदार महिला शेतकरी सुलोचना मुकुंद वाजे यांच्याकडे गेले होते.

वसुलीसाठी पथक आल्याचा राग आल्याने सुलोचना वाजे यांचा मुलगा कैलास मुकुंद वाजे व त्याचा लहान भाऊ (नाव माहीत नाही) यांनी वसुली पथकाची इनोव्हा कारच्या (क्र.एमएच.17-व्ही.9695)  शोकाचेवर दगडफेक केली. त्यात शोकाच फुटल्याने कारचे पाच हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, कैलास वाजे यांनी वसुलीसाठी त्रास द्याल तर विष प्राशन करण्याची   धमकी दिल्याचेदेखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सुलोचना वाजे यांच्या नावे जिल्हा बँकेचे 2006-07 चे 7 ते 7.5 लाख रुपयांचे कर्ज आहे. आतापर्यंत त्याची थकबाकी व्याजासह 16 लाख रुपयांवर पोहचली असल्याने पथक वसुलीसाठी गेले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली. पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या मायलेकाची प्रकृती स्थिर असली तरी ते दोघेही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुलोचना वाजे व कैलास वाजे यांच्या जबाबानंतरच नेमके प्रकरण स्पष्ट होणार आहे.

tags : Sinnar,news, District, Bank's, recovery, team, Attack,


  •