नाशिक : प्रतिनिधी
बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालकांसह सराफ दुकानातील कर्मचार्यांवरही गुन्हा दाखल असून, पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता सर्व फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारी (दि.21) देखील पोलिसांकडे धाव घेतल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रोख गुंतवणूक व सोनेतारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याज परताव्याचे आमिष दाखवून मिरजकर सराफ आणि त्रिशा जेम्स या फर्मच्या संचालक व कर्मचार्यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी एप्रिल 2015 पासून पैसे तसेच सोने संशयितांकडे ठेवी म्हणून ठेवले. मात्र, संशयितांनी ठरल्याप्रमाणे व्याज किंवा परतावा दिला नाही. त्यामुळे पल्लवी उगावकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी 11 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा आकडा 25 कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.