Sun, Jul 21, 2019 10:46होमपेज › Nashik › टीडीआरचा घोटाळा दाखवा, मग चौकशी करतो 

टीडीआरचा घोटाळा दाखवा, मग चौकशी करतो 

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी 

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मागील काही वर्षांत विकास हस्तांतरणीय हक्काचे (टीडीआर) वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. आयुक्त मुंढे हे या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि.6) झालेल्या बैठकीत आयुक्त मुंढे यांनी मौन सोडत टीडीआर घोटाळ्यातील प्रकरणे पुराव्यासहित सादर करा, मी चौकशी करतो अशी भूमिका मांडली. या प्रकरणातील काही फाइल्स तपासल्या असून, त्यामध्ये तथ्य आढळले नसल्याचेदेखील आयुक्त मुंढे यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेच्या नगररचना विभागात काही वर्षांपासून नियमबाह्य कामकाज सुरू असल्याच्या तक्रारीत वाढ होत होती. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त मुंढे यांनी नगररचना विभागातील प्रलंबित फायलींसह कामकाजाची समितीमार्फत चौकशी सुरू केली होती. शहरात ले आउट मंजूर करताना रस्त्यांसाठी जागा सोडावी लागते व ती जागा महापालिकेकडे देखभालीसाठी हस्तांतरित करावी लागते. मात्र, काही प्रकरणांमध्ये मंजूर ले आउटमधील हस्तांतरित रस्त्यांवरही संबंधित ले आउटधारकांना टीडीआर दिल्याचे समोर आले होते.

या सर्व प्रकरणी आयुक्त मुंढे कोणती भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. शुक्रवारी (दि.6) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुंढे यांनी त्यांची भूमिका मांडत टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण दाखवा मग मी चौकशी करतो, असे ते म्हणाले. 10 वर्षांसाठी शहर विकास आराखडा शासन ठरवते. मात्र, काही कारणामुळे आरक्षित जमिनींचे निधीअभावी अधिग्रहण करता येत नाही. कधी कधी न्यायप्रविष्ट विषयामुळे जमीन आरक्षित करता येत नाही. त्यामुळे या जागेवरील आरक्षण उठते. त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य ठरणार नाही. मात्र, ज्या प्रकरणात अधिकारी व कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पुढील 20 वर्षांसाठी नाशिकचा विकास आराखडा तयार झाला आहे. त्यामुळे ज्या जमिनींवर आरक्षण टाकलेले असेल त्यांचे प्राधान्यक्रम ठरवून अधिग्रहण केले जाईल. शिवाय टीडीआरसंबंधी काही प्रकरणांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. मात्र, त्याची चौकशी केली असता त्यात काही तथ्य आढळले नाही. टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण पुराव्यासहित दाखवा मी चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.