Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Nashik › शिवशाही बस-गॅस टँकरचा अपघात

शिवशाही बस-गॅस टँकरचा अपघात

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:28PMविरगाव : वार्ताहर

विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे (ता. बागलाण) गावाजवळ शिवशाही बस व गॅस वाहतूक करणारा टँकर यांच्यात रविवारी (दि.15) समोरासमोर भीषण अपघात झाला. त्यात पंधरा प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथून नंदुरबारकडे जात असलेली शिवशाही बस व ताहाराबादकडून सटाण्याकडे येत असलेला गॅस टँकर यांच्यात ढोलबारे गावाजवळ सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात शिवशाहीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान होऊन बस रस्त्यावर आडवी झाली. तर गॅस टँकर पलटी झाला. 

बस व टँकर चालकासह बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले. तर किरकोळ जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात असून, पंधरा दिवसांच्या कालावधीत या परिसरात हा दुसरा अपघात झाल्याने शिवशाहीतून प्रवास करण्याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

तासाभराने वाहतूक सुरळीत

अपघातास कारणीभूत ठरलेला गॅस टँकर रस्त्याच्या बाजूस पलटी झाल्याने या टँकरमधून गॅस गळती होण्याची भीती व्यक्‍त केली जात होती. यावेळी तालुका प्रशासनाने तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन आवश्यक त्या गोष्टींची खातरजमा केली. टँकरमधून कोणत्याही प्रकारचा गॅस गळती होत नसल्याची खात्री झाल्यानंतर विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर तासाभराहून अधिक कालावधीसाठी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.