Fri, Jul 19, 2019 05:40होमपेज › Nashik › विधान परिषदेसाठी दुसर्‍या  दिवशी नऊ अर्जांची विक्री

विधान परिषदेसाठी दुसर्‍या  दिवशी नऊ अर्जांची विक्री

Published On: Apr 27 2018 11:21PM | Last Updated: Apr 27 2018 10:59PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.27) नऊ अर्जांची विक्री झाली आहे. जिल्हा बँक संचालक परवेझ कोकणी यांनी दोन अर्ज नेले. दोन दिवसात एकूण 14 अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान, दुसर्‍या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.  विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना वगळता इतर पक्षांनी त्यांचे पत्ते अद्यापही उघडलेले नाही. परिणामी निवडणुकीमधील सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे सर्वच पक्षांमधील इच्छुक मात्र अर्ज घेऊन जात आहेत. अर्जविक्रीच्या दुसर्‍या दिवशी परवेझ कोकणी यांच्यासाठी वसीम शेख हे दोन अर्ज घेऊन गेले. चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल हेही एक अर्ज घेऊन गेले आहेत. राष्ट्रवादीचे यतिंद्र पाटील यांनीही दोन अर्ज घेतले आहेत. मकसूद खान इलियास खान हे स्वत: दोन अर्ज घेऊन गेले असून, महेश सावंत यांच्यासाठी सचिन कदम यांनी दोन अर्ज नेले.

शनिवारपासून पुढील चार दिवस सलग सुट्ट्या असल्याने या काळात शासकीय कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आता 2 व 3 मे या दोन दिवसांमध्ये अर्ज विक्रीबरोबरच अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झुंबड उडणार आहे.

सेनेच्या उमेदवाराने घेतले मार्गदर्शन

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे स्वत: शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन घेतले. दरम्यान, दराडे हे 3 मे रोजी पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे.

युतीबाबत प्रयत्न सुरू
राज्यात सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेने नाशिक व रायगडमधून त्यांचा उमेदवार घोषित केला आहे. दुसरीकडे भाजपामधून स्थानिक स्तरावर अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, सेनेशी युती करण्यासाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाजपाच्या जिल्हास्तरीय पदाधिकार्‍याने दिली आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावरून जो आदेश येईल त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. परंतु, युती न झाल्यास पक्षातर्फे वेळेवर उमेदवार दिला जाईल, असेही संकेत या पदाधिकार्‍याने दिले आहेत. 

Tags : Shivsena, BJP,  Nashik Seat, Legislative Council