होमपेज › Nashik › शिवजन्मोत्सवाचा आज नाशिकमध्ये सोहळा

शिवजन्मोत्सवाचा आज नाशिकमध्ये सोहळा

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सोमवारी (दि.19) धूमधडाक्यात साजरा होणार असून, सकल मराठा मोर्चा व बहुजन समाज यांच्यातर्फे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे सकाळी शिवरायांना मानाचा मुजरा केला जाईल. या सोहळ्यास लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असून, पालखी सोहळा हे मुख्य आकर्षण राहणार आहे. दरम्यान, शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अवघे शहर भगवेमय झाल्याचे पहायला मिळाले. शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता.

यंदा प्रथमच तिथी नव्हे तर तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होणार असून, नाशिक पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे. शिवजन्म सोहळा समितीच्यावतीने रात्रीच्या 12 च्या ठोक्याला सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन केले जाईल. दिवाळीसारखा हा सोहळा साजरा केला जाणार आहे. सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर एक लाख शिवभक्त शिवगर्जना करुन छत्रपतींना मुजरा करतील.

शंभर फूट लांव आणि 40 फूट रुंद महाराजांचे बॅनर, 61 फूट उंच भगवा ध्वज, घोडदळ, पायदळ, लेजीम पथक, ढोल पथक, वारकरी मंडळ,महिला, युवती, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट चित्ररथ, सोन्याचा नांगर चालवितांनाचा देखावा, छत्रपती संभाजी महाराज रथ, शिवराज्याभिषेक रथ व शाही मिरवणूक असा ‘याचि देही, याचि डोळा’ बघावा असा सोहळा रंगणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी अवघे शहर भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले होते. सोशल मीडियादेखील भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते.