Fri, Jul 19, 2019 13:46होमपेज › Nashik › शिवडेतील जमीन देण्यास निम्म्या शेतकर्‍यांची संमती

शिवडेतील जमीन देण्यास निम्म्या शेतकर्‍यांची संमती

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:25AMनाशिक : प्रतिनिधी

सिन्‍नर तालुक्यातील आगासखिंड, बेलू गावांमधील जमीन अधिग्रहणाचे काम 95 टक्क्यांपर्यंत पोहचले असून, शिवडेतील 50 टक्के शेतकर्‍यांनी संपर्क साधत समृद्धी प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमती दिल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. तालुक्यात सद्यस्थितीत 60 टक्क्यांपेक्षा अधिकचे जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वे ला शिवडेवासीयांनी पहिल्यापासून कडाडून विरोध दर्शविला. गत महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी सर्वसंमतीने गावात संयुक्‍त मोजणीला परवानगी दिली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, आजपर्यंत मोजणीचे काम सुरू झाले नसले तरी गावातून जाणार्‍या प्रकल्पाच्या एकूण तीन किलोमीटर लांबीपैकी 50 टक्के म्हणजेच दीड किलोमीटर क्षेत्रातील बाधितांनी समक्ष भेटून जमीन देण्यास तयार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शिवडेचा प्रश्‍न एकीकडे सुटलेला नसताना तालुक्यातील इतर गावांमध्ये मात्र जमीन अधिग्रहणाचा वेग अधिक आहे. पांढुर्लीत 70 टक्के तर सावतामाळीनगर, जयप्रकाश नगर, डुबेरे व पाथरेत जवळपास 60 टक्क्यांच्या वर जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

समृद्धी प्रकल्पासाठी सिन्‍नर व इगतपुरी मिळून आत्तापर्यंत 3468 शेतकर्‍यांनी जमीन दिल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्र सुमारे 630 हेक्टर असून, त्याची टक्केवारी 58 इतकी आहे. यामध्ये सिन्‍नरमधील 1462, तर इगतपुरीमधील 2006 शेतकर्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, जमीन अधिग्रहणापोटी बाधित शेतकर्‍यांना एकूण 682 कोटी 43 लाख 73 हजार 31 रुपये इतके आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मार्चएण्डपर्यंत 70 टक्क्यांपर्यंत जमीन अधिग्रहणाचे उद्दिष्ट प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले असून, त्या द‍ृष्टीने प्रशासन कारवाई करत आहे.

जिल्हाधिकार्‍यांची घेतली भेट

शिवडेतील काही शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. या भेटीत जमीनीच्या दराबाबत, संयुक्त मोजणीबाबत तसेच इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. जिल्हाधिकार्‍यांनी प्रथम संंयुक्त मोजणीचे काम पुर्ण करू द्या त्यानंतर प्रत्येक गटानुसार किती नुकसानभरपाई द्यावी लागले याचा आकडा समोर येईल, असे स्पष्ट केल्याचे समजते आहे.

 

Tags : Nashik, Nashik News, Shivade villagers, Mumbai Nagpur Samrudhi Express, Consent,