Sun, May 19, 2019 14:53
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › शिवसेना स्वबळावरच लढणार!

शिवसेना स्वबळावरच लढणार!

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:37AMनाशिक : प्रतिनिधी

महाबळेश्‍वर येथे बोलाविण्यात आलेल्या शिबिरात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच लढल्या जाणार असल्याचा पुनरूच्चार करताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवण्याचे राज्यभरातील महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना सूचित केले. हा संदेश प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहचवून तयारीला लागण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर संपर्कप्रमुखांना कामाला लावण्यात आले. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने  स्वबळाच्या घोषणेला गांभीर्याने घेतले नसल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी वरकरणी दाखविले असले  तरी  सेनेला 140 जागा देण्याची तयारी मात्र कार्यक्रमांच्या निमित्ताने दाखविली जात  आहे.

स्वबळाच्या या  घोषणेनंतर दिल्लीतही काहीअंशी हालचाली सुरू झाल्या होत्या. अधिवेशन सुरू होण्याआधी एनडीएच्या बैठकीला सेनेच्या मंत्र्याने लावलेली हजेरी डोळे विस्फारणारी ठरली होती.  ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा तर दुसरीकडे बैठकीला उपस्थिती, या विरोधाभासामुळे संभ्रमही निर्माण झाला होता. हा  संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण करण्याचाच  भाजपेयींचा डाव असल्याचा संशय सेनेला होताच. सेनेच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकत्याच महाबळेश्‍वरला झालेल्या शिबिरात मात्र हा संभ्रम खुद्द उद्धव यांनीच दूर के ला आहे.

आगामी निवडणुका ह्या स्वबळावरच लढल्या जाणार असून, यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, कोणीही विचलित होण्याची गरज नाही, हे सार्‍याच महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना स्पष्ट करून देण्यात आले. स्वबळाचा नारा सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही या पदाधिकार्‍यांवर सोपविण्यात आली असून, कामाला लागण्याचा आदेशच देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे विभाग तसेच उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांचा अभ्यास करण्यासाठी 18 पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.