होमपेज › Nashik › शिवसेना स्वबळावरच 

शिवसेना स्वबळावरच 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:30PMनाशिक : प्रतिनिधी

दोन्ही काँग्रेसचे मन किती जुळले हे माहीत नाही; पण ‘लकवा’ मारलेले दोन्ही हात एकत्र आले आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र, आघाडी झाली म्हणून युती होणार नाही, असे सांगत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवेल, असा ठाम इरादा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे हे रविवारी (दि.6) नाशिकमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यापूर्वी ज्या ठिकाणी शिवसेना व भाजपा एकत्र सत्तेत आहे त्या ठिकाणी युती कायम राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच, दोन्ही काँग्रेसला सत्तेसाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, जनतेने 15 वर्षे त्यांचा अनुभव घेतला आहे, असा टोला त्यांनी लगावला. नाणार प्रकल्पावर भाष्य करताना हा विषय शिवसेनेसाठी संपला असून, हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. देशात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे तेल रिफायनरी आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात, विदर्भात समुद्र नाही. त्यांनी हे मोदी यांना सांगावे. ते विदर्भातसुद्धा समुद्र आणतील, असे सांगत आता रजनीकांतसुद्धा मोदींना घाबरतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेने नाणार प्रकल्प जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय संपवला आहे. हा प्रकल्प विदर्भात घेऊन जावा. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी ठोस योजना राबवाव्यात. भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात होऊ शकतो, याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्यावर अधिक विश्‍वास वाटतो, अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांची एकदा शाळा घ्यावी, असा टोला लगावला. यावेळी सेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

पालघरमध्ये वणगांना उमेदवारी 

चिंतामण वणगा यांनी पालघरमध्ये संघ व हिंदुत्वाचे पाळेमुळे खोल रुजवले. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपाने त्यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष केले. महिनाभर त्यांना भेटदेखील दिली नाही. मात्र, निवडणूक जाहीर होताच भाजपाला वणगांची आठवण झाली. हा अनुभव घेतल्याने वणगा परिवाराने माझी भेट घेतली. त्यांची इच्छा असेल तर त्यांना शिवसेना उमेदवारी देईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

भाजपाला ‘कर नाटका’साठी मोकळे रान 

कर्नाटकात बेळगाव सीमाभागात राहणार्‍या नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी एकसंधपणे उभे राहावे. सीमाभागातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, त्यास मतदारांनी बळी पडू नये. मराठी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी शिवसेनेने सीमावर्ती भागात उमेदवार दिला नाही. भाजपाला निवडणुकीत ‘कर नाटक’ करण्याची पूर्ण संधी आहे, असे टीकास्त्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सोडले.