Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Nashik › एक देश, एक संविधान लागू करा

एक देश, एक संविधान लागू करा

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:30PMनाशिक : प्रतिनिधी

‘वन इलेक्शन वन नेशन’ ही संकल्पना निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता ‘एक देश एक संविधान’ याबाबतही भाजपाने विचार केला पाहिजे. भाजपाकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता लोकांना मूर्ख बनविणे फार काळ चालणार नाही. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2019 भाजपाला अजिबात यश मिळणार नाही, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक दौर्‍यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणुकीविषयीचे सर्वेक्षण भाजपाकडून मुद्दामहून घडवून आणले जात आहे. परंतु, आगामी राजस्थान, छत्तीसगड यासह पाच राज्यांमधील निवडणुकीत भाजपाचा असली चेहरा समोर येईल. निवडणुका एकत्रित घ्याव्यात की कशा यापेक्षा देशहित महत्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजे. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक राजकीय पक्षांना आणि मतदारांना विधानसभा निवडणुकीत सुधारविण्याची संधी मिळते. त्यालाच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आणि लोकशाही म्हणता येईल. परंतु, सध्या भाजपाकडून केवळ बळजबरी लादली जात असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. आम्ही निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सदैव तयार आहोत. महाराष्ट्रात सर्व पक्षांबरोबर टक्‍कर देण्यास शिवसेना पुरेशी आहे. आम्हाला आघाडीचीही गरज नाही, असेही त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला उत्तर देताना सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनात महाराष्ट्रात पुणे आणि औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसायाचे नुकसान झाले. चाकण येथील ऑटोमोबाइल हबवरील हल्ला आणि वाळूंज येथील कंपन्यांवरील हल्ल्यात कोण आहेत हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. या घटनांना सरकार जबाबदार असून, ते कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. भाषणात मोठ्या प्रमाणावर फसव्या घोषणा करून मतदान मिळविण्याचे काम केले जात आहे. निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या प्रचारावरील भाषणांना निवडणूक आयोगाने बंदी आणावी आणि तशी आचारसंहिता लागू करावी. कारण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे काही एकट्या त्या पक्षाचे नसतात.