Thu, Apr 25, 2019 18:37होमपेज › Nashik › पोटनिवडणुकीत भाजपाच्या भूमिकेकडे शिवसेनेचे लक्ष

पोटनिवडणुकीत भाजपाच्या भूमिकेकडे शिवसेनेचे लक्ष

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

पश्‍चिम विभागातील प्रभाग 13 ‘क’ साठी होणार्‍या पोटनिवडणुकीत भाजपाने उमेदवार दिल्यास ही निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. यामुळे भाजपाच्या चालीवर शिवसेनेचे नियोजन अवलंबून राहणार असून, सध्या शिवसेनेच्या खाती चार इच्छुक उमेदवार आहेत. 

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे प्रभाग 13 ‘क’ ही जागा रिक्‍त झाली आहे. त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित होऊन 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भोसले यांच्याप्रति भावना व्यक्‍त करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी खरे तर त्याचवेळी दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाही, असे सांगितले होते. यामागे संबंधित जागेसाठीची निवडणूक भोसले कुटुंबीयांतील उमेदवारासाठी बिनविरोध करण्यात यावी, असा उद्देश होता. 

दोन्ही काँग्रेसचे हे मत असले तरी भाजपा आणि शिवसेनेने मात्र अद्याप कोणतीही भूमिका व्यक्‍त केलेली नाही. यामुळे निवडणूक होणार अशी चिन्हे सध्या तरी आहे. भाजपाने उमेदवार दिला, तर मग शिवसेनाही उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण भाजपामुळे शिवसेनेला ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरू शकते. सध्या शिवसेनेकडे या जागेसाठी चार उमेदवार इच्छुक आहेत.

यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इतर पक्ष काय भूमिका घेतात त्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. भाजपाने उमेदवार दिला तर मग शिवसेना उमेदवार देईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज (दि.9) सायंकाळी 5 वाजता पक्ष कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.