Sat, Jul 20, 2019 09:23होमपेज › Nashik › शिर्डी दुहेरी खून प्रकरणी आज निकालाची शक्यता

शिर्डी दुहेरी खून प्रकरणी आज निकालाची शक्यता

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 03 2018 12:13AMनाशिक : प्रतिनिधी

शिर्डी येथील दोघा तरुणांचे अपहरण करून त्यांच्यावर रात्रभर अत्याचार, मारहाण करून निर्घृण खून केल्याप्रकरणाची सुनावणी विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुरुवारी (दि.3) निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गुन्ह्यात कुख्यात गुन्हेगार पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख (32) याच्यासह त्याच्या टोळीतील 24 गुंडांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी येथे 14 जून 2011 ला रात्रीच्या सुमारास संशयित आरोपींनी प्रवीण विलास गोंदकर आणि रचित पटणी या दोघा युवकांचे अपहरण केले होते. संशयितांनी खंडणीतील रकमेबाबत तडजोड करण्यासाठी राहता येथील हॉटेल सुरभी येथे बोलवले. तेथून दोघा मित्रांचे अपहरण करून त्यांना निमगाव येथील वाल्मीक पावलस जगताप याच्या शेतात नेऊन रात्रभर मारहाण केली. या मारहाणीत प्रवीण आणि रचित या दोघा मित्रांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विलास पंढरीनाथ गोंदकर (47, रा. बिरेगाव रोड, शिर्डी) यांनी संशयितांविरोधात अपहरण, खुनाची फिर्याद दाखल केली. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या पथकाने तपास करून 24 पैकी 23 संशयितांना अटक केली.

दोषारोपपत्र दाखल करून संशयितांविरोधात 22 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने पोलिसांनी पाप्या शेख टोळीविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. शिर्डी येथे सुनावणी दरम्यान, साक्षीदारांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याने हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चालवण्यात आला. सुरुवातीचे दोन साक्षीदार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपासले तर उर्वरित 41 साक्षीदार अ‍ॅड. अजय मिसर यांनी तपासले. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार विशेष (मोक्का) न्यायाधीश व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा हे गुरुवारी (दि.3) या गुन्ह्याचा निकाल सुनावण्याची शक्यता आहे. 

टोळीची दहशत

पाप्या शेख टोळीतील गुन्हेगारांची दहशत असल्याने साक्षीदारांवर दबाव होता. काही साक्षीदार साक्ष देण्यासही तयार होत नव्हते. सुनावणीवेळी साक्षीदारांवर दबाव नको यासाठी संशयित आरोपी आणि साक्षीदारांमध्ये पडदा ठेवण्यात येत होता. काही साक्षीदारांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले. 

पुराव्यांची जुळवाजुळव

या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे संशयितांविरोधात आरोप सिद्ध करावा लागत होता. त्यामुळे संशयितांकडून जप्‍त केलेले मोबाइल, त्यातील क्‍लिप्स, संभाषण, प्रवीण आणि रचितचे फोटो, संशयितांचे कॉल रेकॉर्ड्स, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्‍त करण्यात आली. व सर्व घटनाक्रमांची सांगड घालण्यात आली. 

संशयितांची नावे 

पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख (32), विनोद सुभाष जाधव (31), सागर मोतीराम शिंदे (19), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (26), माउली ऊर्फ ज्ञानेश्‍वर शिवनाथ गुंजाळ (22), गनी मेहबूब सय्यद (30), चिंग्या ऊर्फ समीर निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण (23), सागर शिवाजी काळे (20), राजेंद्र  गुंजाळ (33), इरफान अब्दुल गनी पठाण (20), नीलेश देवीलाल चिकसे (19), मुबारक ऊर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (32), वाल्मीक पावलस जगताप (42), निसार कादीर शेख (24), दत्तात्रय बाबूराव कर्पे (35), भरत कुरणकर (49), बिसमिल्ला पाप्या ऊर्फ सलीम शेख (25), संदीप श्यामराव काकडे (24), हिराबाई श्यामराव काकडे (49), मुन्ना शेख (24), राजू शिवाजी काळे (21), प्रकाश सुरेश अवसरकर (22). या सर्व संशयितांविरोधात अपहरण, खंडणी, खुनासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Tags : Nashik, Shirdi, double, murder, listening, today