Thu, Nov 15, 2018 20:17होमपेज › Nashik › राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदावर सात जणांचा दावा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदावर सात जणांचा दावा

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर सात इच्छुकांनी दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या पदाच्या निवडीचे अधिकार प्रदेश स्तराला देण्यात आले आहे. तसा ठराव पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीनंतर पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाशिक तालुका अध्यक्षांच्या निवडीचा फैसलाही प्रदेश स्तराच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत पक्षाच्या शहर व जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांची नियुक्‍ती केली जात आहे. पक्षाच्या मुंबई नाका येथील कार्यालयात रविवारी (दि. 22) जिल्हाध्यक्षपदासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे निरीक्षक अविनाश गोविंद आदिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सात इच्छुकांनी या पदासाठी  अर्ज दाखल केले. यामध्ये विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, काेंंडाजी आव्हाड आणि सचिन पिंगळे यांनी अर्ज केले.

बैठकीत जिल्हाध्यक्षपदावर एकमत न झाल्याने अखेर ही सर्व नावे प्रदेश स्तरावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठराव करून त्यावर इच्छुकांच्या स्वाक्षर्‍याही घेण्यात आल्या. तसेच प्रदेशाने ठरवून दिलेल्या उमेदवारासोबत अन्य इच्छुकांनी भविष्यात खांद्याला-खांदा लावून काम करण्यावरही बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

Tags : nashik, nashik news, NCP District President, Seven people claim,