Wed, Nov 21, 2018 13:33होमपेज › Nashik › पंचवटीत सातशे किलो गांजा जप्त

पंचवटीत सातशे किलो गांजा जप्त

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 11:45PMपंचवटी : वार्ताहर 

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपोवन परिसरात सापळा रचून 34 लाख  रुपये किमतीचा सुमारे सातशे किलो गांजा पकडला आहे. भाजीपाल्याच्या क्रेटच्या मागे लपवून गांजाची वाहतूक सुरू असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. वाहनातील दोन संशयितांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

यतीन अशोक शिंदे (35, रा. म्हसरूळ) आणि सुनील नामदेवराव शिंदे (47, रा. मिरचीचे पालखेड, ता. निफाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 680 किलो गांजा आणि एमएच 12 ईक्यू 1429 क्रमांकाचा आयशर ट्रक असा एकूण 49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मंगळवारी (दि.12) खबर्‍यांमार्फत माहिती मिळाली की, ओडिसा येथून एका आयशर गाडीत 1200 किलो गांजा येणार आहे. या माहितीनुसार सहायक पोलीस आयुक्‍त अशोक नखाते, युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर गुन्हे शोध पथकाचे प्रवीण कोकाटे, वसंत पांडव आदींसह कर्मचार्‍यांनी तपोवन येथील बडा लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे आयशर वाहन दिसताच गुन्हे शोध पथकाने वाहन अडवून त्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या क्रेटच्या मागे गोण्यांमध्ये भरून ठेवलेला गांजा पोलिसांनी जप्‍त केला.घटनास्थळी वजनकाटा आणून त्याचे वजन केले असता 680 किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. गांजा पकडण्याची कारवाई थेट रस्त्यावर झाल्याने येणारे जाणारे नागरिक मोठ्या कुतूहलाने याकडे बघत होते.