होमपेज › Nashik › नाशिक सात शहरांना जोडले जाणार

नाशिक सात शहरांना जोडले जाणार

Published On: Jan 25 2018 1:49AM | Last Updated: Jan 25 2018 1:42AMनाशिक : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या ‘उडाण-2’ योजनेंतर्गत आता नाशिक शहर येत्या काळात देशातील महत्त्वाच्या सात शहरांना जोडले जाणार असून, यासंदर्भात केंद्राच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने ही नावे जाहीर केली आहेत. 

उडाण-2 अंतर्गतची विमानसेवा महिन्याभरात सुरू होण्याची शक्यता असली तरी केंद्रीय मंत्रालयाने त्यास सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. यापूर्वी उडाण योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक येथून पुणे व मुंबई ही विमानसेवा सुरू झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून ही योजना सुरू असून, गेल्या वर्षातील 30 सप्टेंबर रोजीच ही सेवा खरेतर सुरू होणार होती. त्यानंतर केंद्र शासनाने विमानसेवेबाबत शहरांची नावे जाहीर केली असता त्यात नाशिकचे नाव वगळण्यात आले होते.

हवाई वाहतूक विभागाच्या नियमानुसार आठवड्यातून 14 वेळा विमान लँडिंग व टेकऑफ होईल, अशा शहरांना वगळण्यात आले होते. परंतु, ही बाब खासदार हेमंत गोडसे यांच्या लक्षात येताच त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयातील संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून नाशिक येथून अद्याप अखंडित विमानसेवाच सुरू झालेली नाही. यामुळे विमान लँडिंग व टेकऑफचा प्रश्‍नच निर्माण येत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर एअरलाइन्सविषयी लिंक ओपन करताना त्यात नाशिकसाठी पहिल्या टप्प्यात पुणे व मुंबई सेवा सुरू करण्यात आली.

या योजनेंंतर्गत नाशिक येथून आता अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, दिल्ली, गोवा, हैदराबाद, हिंदण या सात मुख्य शहरांना जोडले जाणार आहे. याच योजनेंतर्गत केंद्रीय हवाई वाहतूकने महाराष्ट्रासह 19 राज्यांतील 73 शहरांचा समावेश केला असून, त्यात महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, कोल्हापूर व सोलापूर शहराचा समावेश आहे. इंडिगो, ट्रुजेट, स्पाइस जेट, जेटएअरवेज, एअरलाइन्स या पाच विमान कंपन्यांची विमाने येत्या काळात नाशिक येथून मुख्य शहरांकडे झेपावणार आहेत.