Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Nashik › भूसंपादनासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित करा

भूसंपादनासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित करा

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

जुन्या भूसंपादन प्रकरणांबाबत प्राधान्यक्रम निश्‍चित करून मिळकत विभाग व नगररचना विभागाने यादी सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. विकास आराखड्यानुसार भूसंपादन प्रक्रियेची अंमलबजावणी करून जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी दोन्ही विभागांना सूचना दिल्या आहेत. 

महापालिकेतील मिळकत विभागाकडून आजवर भूसंपादनाविषयी केवळ मनमानीच सुरू होती. शहरातील बड्या हस्ती आणि काही बांधकाम व्यावसायिकांच्या जागा ताब्यात घेऊन त्यांचा मोबदल्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी नेहमीच प्रयत्न केले. पंचवटीसह काही भागातील शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेऊन 20 वर्षे उलटली आहेत. संपादित जमिनीवर आरक्षणे विकसित करण्यात आली आहे. असे असताना अद्यापही संबंधितांना मोबदला मिळू शकलेला नाही. अशा शेतकर्‍यांची संख्या जवळपास 150 हून अधिक आहे. जुन्या शहर विकास आराखड्याअंतर्गत जवळपास पाचशे आरक्षणे टाकण्यात आली होती. त्यापैकी तीनशे ते साडेतीनशे आरक्षणे आजही मनपाने ताब्यात घेतली नाही की त्यासाठी कधी पुरेसे प्रयत्नही केले नाहीत. यामुळे 127 च्या नोटीसद्वारे आरक्षणे व्यपगत झाली तसेच काही आरक्षणे बिल्डरांसाठी आणि शहरातील मोठ्या हस्तींच्या भल्यासाठी उठविण्यात आली. नवीन शहरविकास आराखडा आणि जुना आराखडा मिळून जवळपास साडेसहाशे ते पावणेसातशे आरक्षणे ताब्यात घ्यायची असून, त्यासाठीचे नियोजन आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मिळकत विभाग व नगररचना विभागाला करण्याच्या सूचना दिल्या असून, 20 वर्षांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही संबंधित दोन्ही विभागांचीच असल्याचे आयुक्‍तांनी बजावले आहे.

अनुदान वाटपात चुका 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी आरोग्य विभागाकडून साडेसहा हजार लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात आले आहे. प्रत्येकी बाराशे अनुदान एका लाभार्थ्यास अदा केले आहे. परंतु, हे अनुदान वाटप करण्यात अनेक चुका झाल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यासंदर्भातही आयुक्‍तांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. कचरा विलगीकरण करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या असून, किती कचरा जमा होतो, किती कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते याबाबत माहिती घेण्यास सांगितले.