Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Nashik › सेनेचे किशोर दराडे विजयी

सेनेचे किशोर दराडे विजयी

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:22AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी दुसर्‍या पसंतीची तब्बल सात हजार 483 मते घेत दणदणीत विजय मिळवत आमदार होण्याचा बहुमान पटकावला. दराडे यांच्या करिष्म्याने शिवसेनेने पहिल्यांदाच नाशिक शिक्षक मतदारसंघावर भगवा फडकवत इतिहास घडवला. टीडीएफ संघटनेतील दुही आणि भाजपातील बंडखोरी दराडेंच्या पथ्यावर पडली. निवडणुकीत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपाबरोबरच राष्ट्रवादीला धोबीपछाड देत जुने हिशेब चुकते केले.

अंबड येथील वेअर हाउसमध्ये गुरुवारी (दि.28) सकाळी सुरू झालेली मतमोजणी शुक्रवारी पहाटेपर्यंत चालली. तब्बल 20 तासांहून अधिक वेळ झालेल्या या मतमोजणीत दराडे हे विजयी झाले. पहिल्या फेरीत 47 हजार 769 वैध मतांची मोजणी केली गेली. त्यात दराडे यांना 16 हजार 886  मते पडली. राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे यांना 10 हजार 970 इतकी मते मिळाली. या दोन्ही उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत चुरस पाहावयास मिळाली. भाजपा उमेदवार अनिकेत पाटील तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला 23 हजार 990 मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाही. त्यामुळे दुसर्‍या पसंतीची मते मोजण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतला.रात्री 9 वाजता मतमोजणीची दुसरी फेरी सुरू झाली. पहाटे 4 पर्यंत ही फेरी चालली. तब्बल 14 उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजण्यात आली. पहिल्या फेरीप्रमाणे दुसर्‍या फेरीतही दराडे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. शेवटच्या 16 व्या उमेदवारापासून पसंती क्रमाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. एक-एक उमेदवार बाद करत त्यांना मिळालेली मते पुढील उमेदवारांना बहाल करण्यात आली.