होमपेज › Nashik › विद्यार्थ्यांनी ‘जुगाड’ नव्हे, नवनिर्मितीवर भर द्यावा 

विद्यार्थ्यांनी ‘जुगाड’ नव्हे, नवनिर्मितीवर भर द्यावा 

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 20 2018 1:17AMनाशिक : प्रतिनिधी 

जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, शिक्षण क्षेत्रदेखील त्यास अपवाद नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब शिक्षणात दिसले पाहिजे. शिक्षणामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.  इस्त्रोचा उपग्रह सोडण्याचा विक्रम, चांद्रयान मोहीम हे भारताच्या युवा पिढीचे यश आहे. विद्यार्थ्यांनी जुगाडावर विश्‍वास न ठेवता नवनिर्मितीवर भर देऊन जगाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या शतकपूर्ती सोहळ्याचा सोमवारी (दि.19) समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर, लेखिका इंद्रायणी सावकार, डॉ.मो.स.गोसावी, कीर्तनकार चारुदत्त आफळे, स्वामी जर्नादन दासजी आदी उपस्थित होते. यावेळी शंभरवर्षपूर्ती निमित्त गो.ए.सोसायटीकडून डॉ.माशेलकर यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ.काकोडकर यांच्या हस्ते, एक लाख रुपये धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. डॉ.माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना यशाचा गुरुमंत्र दिला. मोठे ध्येय बाळगा, त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मेहनत घ्या, संधीचा शोध घ्या, अपयशातून बोध घ्या आणि जगात अशक्य असे काही नाही, ही पाच तत्वे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. डॉ.निगवेकर यांनी शिक्षण क्षेत्रापुढील आव्हाने व संधी याबद्दल मार्गदर्शन केले. तत्पूर्वी विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा निर्माण करणार्‍या सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.मो.स.गोसावी यांच्या हस्ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल डॉ.काकोडकर व डॉ.निगवेकर यांना गौरविण्यात आले.