Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Nashik › जिल्हा परिषदेत कोणी आजारी, तर कोणाचे वय झाले

जिल्हा परिषदेत कोणी आजारी, तर कोणाचे वय झाले

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:08PMनाशिक : प्रतिनिधी

कोणी गंभीर व्याधीने त्रस्त, तर कोणाचे वय झालेले...जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहायकपदी पदोन्‍नतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर यांसारख्या अनेक तक्रारी समोर आल्या असून, यासंदर्भात लिपिकवर्गीय संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन कैफियत मांडली. 

गेल्या आठवड्यात सहायक प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ सहायकपदाच्या पदोन्नतीची कार्यवाही पार पडल्यानंतर तक्रारींचा सूर आळविला जात आहे. प्रशासनाने मर्जीतील कर्मचार्‍यांची मुख्यालयताच सोय केल्याने खदखद सुरू आहे. तर काही कर्मचारी गंभीर व्याधींनी ग्रस्त असून, त्यांना थेट तालुक्याच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे. एका कर्मचार्‍याची कौटुंबिक समस्या असून, त्याला नांदगाव पंचायत समितीत  नियुक्ती देण्यात आली आहे. काही कर्मचारी सेवानिवृत्त होण्यास दोन-तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांना तालुक्याला पाठविण्यात आले आहे. 

वरिष्ठ सहायकपदी 20 कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली त्यातील 17 कर्मचारी वरील कारणांमुळे बेजार असल्याने पदोन्नती मिळूनही ते नाखूश असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने बाजू लक्षात न घेतल्याने हे कर्मचारी पदाधिकार्‍यांच्या दालनाचे उंबरठे झिजवत आहेत. तर संघटनेनेही या कर्मचार्‍यांच्या तक्रारी मांडण्यासाठी गिते यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांनाच बोलू द्या, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सुनावण्यात आले. त्यानंतर गिते यांनी चर्चेस प्राधान्य दिले. ज्यांच्या समस्या खरोखरच गंभीर असतील त्यांच्या नियुक्तीत बदल करण्याची तयारी दर्शविण्यात आली.