Wed, Jun 26, 2019 17:55होमपेज › Nashik › दारू विकणार्‍यांनी इतर व्यवसाय शोधावा : नखाते

दारू विकणार्‍यांनी इतर व्यवसाय शोधावा : नखाते

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:10PM

बुकमार्क करा

येवला : प्रतिनिधी

मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा नशा पाणी करण्यासाठी उधळू नका. कष्टाच्या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. दारू विकणार्‍यांनी आता इतर व्यवसाय करावा. दारूमुळे इतरांचे संसार मोडतात. दुसर्‍यांचे संसार मोडून आपला संसार घडत नसतो. त्यामुळे दारू विकणार्‍यांनी दुसर्‍यांचे संसार मोडून आपले संसार सुधारू नयेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. स्वाती नखाते यांनी केले. 

ममदापूर येथे छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने कौतुक गावकारभार्‍यांचे व दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ या विषयावर मराठा क्रांती मोर्चाच्या रणरागिणी अ‍ॅड. स्वाती नखाते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नखाते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेवक रुपेश दराडे होते. यावेळी छत्रपती मित्रमंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. नखाते म्हणाल्या, नवीन वर्ष सुरू होत आहे. दिनदर्शिका घेताना जरा पाहूनच घ्या. ज्या दिनदर्शिकेत, 12 जानेवारी जिजाऊ जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असा उल्लेख असेल तरच ती दिनदर्शिका विकत घ्या. अन्यथा या छत्रपती मित्रमंडळानेही छान दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे, ती घ्या असे आवाहन यावेळी नखाते यांनी केले.

वाढती व्यसनाधीनता यावर अ‍ॅड. नखाते म्हणाल्या  दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट हे कोणतेही व्यसन अतिशय घातक आहेत. हे व्यसन करू नका. युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्तीसाठी झटले पाहिजे, हुंडा देऊ नका, घेऊ नका असे आवाहनही नखाते यांनी केले. यावेळी अध्यक्ष रुपेश दराडे, बाळासाहेब दाणे, सुनील गायकवाड यांनी या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दिनेश राऊत यांनी केले.

दीपक जगताप, मनीषा गिर्‍हे, मोतीभाऊ वाघ, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब डमाळे, अ‍ॅड. समीर देशमुख, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, रश्मी पालवे, मकरंद सोनवणे, एकनाथ गायकवाड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. गोरख वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश राऊत यांनी आभार मानले. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.