Tue, Jul 16, 2019 10:00होमपेज › Nashik › अस्वच्छता पाहून मनपा पदाधिकारी झाले संतप्त 

अस्वच्छता पाहून मनपा पदाधिकारी झाले संतप्त 

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:09AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शुक्रवारी (दि.5) महापौरांसह पदाधिकार्‍यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. ठिकठिकाणची अस्वच्छता पाहून यावेळी पदाधिकारी अधिकार्‍यांवर संतप्त झाले.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी शहरातील अनेक ठिकाणी अचानक भेटी दिल्या. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मेळा बसस्थानक, सेंट्रल बसस्थानक, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, शरणपूर रोड, महात्मा फुले मार्केट, फाळके रोड आदी ठिकाणी पाहणी केली. यापैकी महात्मा फुले मार्केट आणि शिवाजी उद्यान येथील स्वच्छतेविषयीची दुर्दशा पाहून पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत तत्काळ स्वच्छता करण्याचे आदेश दिले. उद्यानात सर्वत्र अस्वच्छता तर होतीच शिवाय त्या ठिकाणची बहुतांश खेळणी तुटलेली व चोरीला गेलेली असल्याचे आढळून आले. दोन्ही बसस्थानक आवारात आणि परिसरातही तेथील व्यवस्थापनाकडून स्वच्छता केली जात नसल्याचे दिसून आल्याने महापौरांनी बस आगारप्रमुखांनाही स्वच्छतेच्या सूचना केल्या. बहुतांश ठिकाणी समस्या जाणून घेत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तेथील नियमित स्वच्छता व विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, हिमगौरी आहेर, स्वाती भामरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.