Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Nashik › निफाडसह येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

निफाडसह येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 11:07PMजातेगाव : वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात जातेगाव, बोलठाण, जवळकी, गोंडेगाव, रोहिले, ढेकू  कुसुमतेल, लोढरे, ठाकरवाडी, वसंतनगर, चंदनपुरी परिसरातील भागात पावसाअभावी शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

सात जूनला सुरुवात झालेल्या पावसाळ्याचे मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने शेतकरी बांधवांनी  आता दुबार पेरणी करावी लागेल, अशी चिंता व्यक्‍त केली आहे. शेतकर्‍यांनी कोरड्यात व काही शेतकरी बांधवांनी किरकोळ पाऊस पडल्यानंतर या भागातील नगदी पिके कपाशी, मका, तूर, मठ, मूग, बाजरी आदी पिकांची लागवड, पेरणीचे कामे उरकून घेतले. परंतु या भागात मोठा पाऊस न झाल्याने जमिनीमध्ये दोन ते तीन इंच किरकोळ झालेल्या पावसाची ओल गेली होती. जमिनीची तृष्णा पूर्णपणे भागली नसल्याने आणि ओल हवेमुळे व उन्हामुळे पेरलेले बियाणे उगवले  नाही. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाचे मंडल अधिकारी एस. आर. डोखे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार घाटमाथ्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्रात मका 2200 हेक्टर, कपाशी 1800 हेक्टर आणि उर्वरित क्षेत्रात धान्य, कडधान्य लागवड, पेरणी पूर्ण झालेली आहे. पण पावसाअभावी ही पिके धोक्यात आलेली आहेत.

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी 

खरीप हंगामपूर्व मशागत पूर्ण केलेल्या शेतकर्‍यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. खते, बी-बियाणे विक्रेत्यांची उलाढाल ठप्प झालेली आहे. तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागात झालेल्या पावसाचा अपवाद वगळता इतरत्र अद्याप दमदार पाऊस झाला नाही. रब्बी हंगामातील पिके काढणीनंतर खरिपासाठी दीड महिन्यांपासून शेतकर्‍यांनी मशागती करून ठेवल्या आहेत. पावसाचा अंदाज घेत टोमॅटो, कोबी, फ्लॉवर तसेच इतर पालेभाज्यांची रोपेही शेतकर्‍यांनी  आरक्षित करून ठेवली आहेत. मात्र, पावसाचे आगमन दिवसागणिक लांबले आहे. खरिपाची मका सोयाबीन तसेच बाजरी या पिकांची तयारी करून ठेवली आहे. मात्र, पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे आगमन खूपच लांबलेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना चिंता आहे, अशी प्रतिक्रिया नितीन कापसे या शेतकर्‍याने दिली.