Sun, May 26, 2019 10:35होमपेज › Nashik › तहसील कार्यालयातील गहाळ फायलींचा शोध घ्या

तहसील कार्यालयातील गहाळ फायलींचा शोध घ्या

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:36AMनाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबक रोडवरील पोलीस प्रशिक्षण अकादमीसमोरील जमिनीच्या टेनन्सी सरेंडर केसेसच्या फायली कब्जा पावती रेकॉर्डरूम मधून गहाळ झाल्या आहेत. या प्रकरणी नाशिक तहसील कार्यालयातील गहाळ फायलींचा शोध त्वरित घ्या, असे आदेश राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाने दिले आहेत.

याचिकाकर्ते दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहितीच्या कायद्याच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा कुळ कायदा अव्वल कारकून तहसील कार्यालय नाशिक यांच्याकडे या केसच्या निर्णयाच्या नकला मिळाव्यात यासाठी दोन अर्ज केले होते. मात्र, ही फाइल रेकॉर्ड रूममध्ये आढळून येत नाही. असे उत्तर याचिकाकर्त्यांना देण्यात आले. त्याविरुद्ध दिगंबर अहिरराव यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे अपील करूनही कागदपत्रांचा शोध लागू शकला नव्हता.

या प्रकरणी याचिककर्त्यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिककडे दाद मागितली होती. त्यावर 15 दिवसांच्या आत वरील प्रकरणी अपीलकर्त्याने मागविलेल्या माहितीचा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये शोध घेऊन कागदपत्रे द्यावी, असे आदेश दिले होते. या निर्णयाला एक महिना लोटला तरी याचिककर्त्यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. महत्त्वाच्या ठिकाणी जमीन असल्याने टेनन्सी केसेसचे रेकॉर्ड गहाळ करण्यात आल्याचा संशय याचिककर्त्याने केला आहे. या प्रकरणानंतर राज्य माहिती आयोग खंडपीठाने कडक ताशेरे ओढले असून, तहसील कार्यालयातील गहाळ फाइलचा शोध घ्यावा, असे आदेश दिले आहेत.