Mon, Aug 19, 2019 09:44होमपेज › Nashik › वैज्ञानिकदेखील बाळगतात अंधश्रद्धा :  महेंद्र दातरंगे

वैज्ञानिकदेखील बाळगतात अंधश्रद्धा :  महेंद्र दातरंगे

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:34PMनाशिक : प्रतिनिधी 

देशात बुवा आणि बाबांचे पेव फुटले आहे. समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकला आहे. सर्वसामान्यच नव्हे तर वैज्ञानिकदेखील अंधश्रद्धा बाळगतात. काही वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी अवकाशात यान प्रक्षेपित केले होते. त्यावेळी कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मुहूर्त बघून व लिंबू मिरची बांधून यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते, अशी खंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संडे सायन्स स्कूल या उपक्रमाचा रविवारी (दि.17) समारोप झाला. यावेळी ‘अंधश्रद्धा आणि विज्ञान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सुशिक्षित पिढी चमत्कार, भूलथापांना बळी पडत आहे हे मोठे दुर्दैव आहे. विज्ञानाने मनुष्याला सृष्टी दिली. परंतु, मनुष्याने विज्ञानाकडून द‍ृष्टी घेतली नाही. सुशिक्षित लोकांनी बाबा बुवा व त्यांच्या चमत्काराला विरोध करायला हवा. समाजात वैज्ञानिक द‍ृष्टिकोन वाढविणे गरजेचे आहे. या देशातील काही वैज्ञानिक हे अंधश्रद्धा बाळगतात.

यानाचे प्रक्षेपण करताना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सत्यनारायण पूजनदेखील करण्यात आले होते, ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती बाळगणे आवश्यक असून, विज्ञान हेच अंतिम सत्य आहे. साधू, संतांनी लोकांना वैज्ञानिक द‍ृष्टी बाळगण्याचा सल्ला दिला होता. मात्र, समाज अंधश्रद्धेचा गर्तेत अडकला असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्‍त केली. याप्रसंगी त्यांनी बाबा, बुवा हातचलाखी करून दिवा प्रज्वलित करणे, मुठीतून भस्म व अंगारा काढणे आदी चमत्कार कसे करून दाखवितात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.