Mon, Jun 17, 2019 11:18होमपेज › Nashik › उपाययोजना न केल्यास शाळांच्या इमारती सील

उपाययोजना न केल्यास शाळांच्या इमारती सील

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 12:43AMनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

शहरातील व्यावसायिक व रहिवासी इमारती, रुग्णालयांनंतर शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना व बांधकाम नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार आवश्यक त्या जीवरक्षक उपाययोजना करण्याबाबत अग्निशमन विभागाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानुसार नियमांची पूर्तता करण्यासाठी 30 एप्रिलची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संबंधित शाळांच्या इमारतींना सील ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाकडून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियमाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकांना आदेश देत शहरातील व्यावसायिक, रहिवाशाी इमारती तसेच रुग्णालये आणि शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये आवश्यक ते निकष व नियमांची पुर्तता करण्यास सांगितले आहे. मनपाच्या अग्‍निशमन विभागाकडून व्यावसायिक इमारतींना जाहीर नोटीस बजावण्यात आली असून, शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना अग्‍निप्रतिबंधक उपाययोजना तसेच बांधकाम नियंत्रण नियमावलीतील तरतुदींची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यापैकी आजवर 204 रुग्णालयांनी नियम व निकषांच्या आधारे पुर्तता केली असून, 161 रुग्णालये अडचणीत सापडले आहेत. या रुग्णालयांना आता राज्य शासनाच्या अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या धोरणानुसार पूर्तता करावयाची आहे. यामुळे रुग्णालयांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शहरातील रुग्णालयांचा प्रश्‍न ताजा असतानाच आता शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींही मनपाच्या रडारवर आल्या आहेत. अग्‍निशमन विभागाकडून शाळा इमारतींना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय व शासनाने दिलेल्या आदेशानुसार आगप्रतिबंधक उपाययोजना व जीवरक्षक तरतुदींचे पालन न केल्याने 15 फेब्रुवारी 2018 रोजी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही संबंधित शाळा व महाविद्यालय चालकांनी ही बाब नजरेआड केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यानंतर आता 30 एप्रिलही अंतिम मुदत देण्यात आली असून, 1 मे रोजी कोणत्याही प्रकारची सूचना न देता इमारत सील केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Tags  : Nashik, School buildings, sealed,  measure,