Sat, May 25, 2019 23:17होमपेज › Nashik › केंब्रिजमध्ये शिक्षिकेने पिळला विद्यार्थ्याचा कान

केंब्रिजमध्ये शिक्षिकेने पिळला विद्यार्थ्याचा कान

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:22PMइंदिरानगर : वार्ताहर  

गृहपाठ न केल्याने जेलरोड येथील एमराल्ड पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिकेने  विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच इंदिरानगरमधील नाशिक केंब्रिज शाळेत चित्रकलेचे साहित्य न आणल्यामुळे शिक्षिकेने बालवाडीच्या विद्यार्थ्याचा कान पिळून दुखापत केली आहे. या कारणावरून  शालेय प्रशासनाने अंतरा बॅनर्जी या शिक्षिकेला निलंबित केले आहे. ज्ञानदानाचेे काम करणार्‍या गुरुजनांकडून अशा प्रकारचे कृत्य होत असल्यामुळे पालकवर्गामध्ये संताप व नाराजी व्यक्‍त केली जात असून, मुलांना शाळेमध्ये पाठवावे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक केंब्रिज शाळेत सिनिअर केजीमध्ये शिकणारा पार्थ केतन गुंजाळ या विद्यार्थ्याने चित्रकलेसाठी रंगकाम करण्याचे साहित्य न आणल्याने अंतरा बॅनर्जी या शिक्षिकेने त्याचा डावा कान पिळला. घरी गेल्यानंतर त्याने कान दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केली आणि संबंधित घटना सांगितली.  पालकांनी त्याला  डॉक्टरांकडे नेले असता कान पिळल्याने  तेथील रक्‍त गोठले आणि कान काळा पडला आहे, असे सांगितले. मुलगा घाबरत  असल्याने त्याच्या पालकांनी  शालेय व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली. व्यवस्थापनाने तक्रारीची दखल घेत मुलाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने नोकरीस रुजू होतांना शिक्षकांकडून भरून घेण्यात आलेल्या ‘कोड ऑफ कंडक्ट’नुसार ही कृती नियमबाह्य ठरल्याचे आढळून आल्याने शाळेचे विश्‍वस्त राहुल रामचंद्रन आणि भारती रामचंद्रन यांनी संबंधित शिक्षिकेला निलंबित केले असून, चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, शहरात नाशिकरोड पाठोपाठ लहान बालकांच्या मारहाणीची  घटना घडल्याने शालेय प्रशासनांनी शिक्षकांना  समजावून सांगण्याची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्‍त केले आहे.

क्षुल्लक कारण असताना आणि त्यात कानासारख्या नाजूक अवयवाला इजा झाल्याने शालेय व्यवस्थापनाकडे तक्रार केली. सुरुवातीला इतर शिक्षक हे प्रकरण टाळण्यासाठी प्रयत्न करीत होते, परंतु विश्‍वस्त राहुल रामचंद्रन यांनीच भेटण्याची परवानगी दिली. तसेच, त्यांनी केलेल्या कारवाईमुळे समाधानी आहे. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती व्हायला नको.
- केतन गुंजाळ, पालक