होमपेज › Nashik › शिष्यवृत्तीचा तिढा यंदाही कायम

शिष्यवृत्तीचा तिढा यंदाही कायम

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:36PMनाशिक : प्रतिनिधी

‘ऑनलाइन की ऑफलाइन’ या तिढ्यामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे डोळ्यासमोर असताना यावर्षीही विद्यार्थ्यांना वेळीच शिष्यवृत्ती मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शिष्यवृत्ती ‘ऑनलाइन की ऑफलाइन’ द्यायची, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सरकारचे मार्गदर्शन मागविले आहे.

इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, गुणवत्ता शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, विद्यावेतन यांसारख्या योजनाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जातात. दोन वर्षांपासून मात्र या योजनांना घर-घर लागली आहे. आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक समस्या कारणीभूत ठरली होती. त्यानंतर मात्र निधी उपलब्ध करून देण्यास विलंब झालाच शिवाय ‘ऑनलाइन की ऑफलाइन’चा तिढाही कायम होता. अगोदर ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर  ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील आदेश समाजकल्याण विभागापर्यंत पोहचण्यासाठी फेब्रुवारी उजाडला. या कारणांमुळेच गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळू शकली नाही.

याहीवर्षी वेळेत शिष्यवृत्ती मिळविण्याविषयी साशंकता आहे. कारण, ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती द्यायची, यासंदर्भातील निर्णय अद्याप घेण्यात आलेलाच नाही. त्यामुळे प्रस्ताव पाठविण्यास शाळांनाही अडचणी येत आहेत. तर तालुकास्तरावर अद्याप शिबिरांनाही सुरूवात झाली नाही.  

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने होत आले असले तरी शिष्यवृत्तीतील संभ्रमावस्था कायम आहे. एवढेच नाही तर शिष्यवृत्तीसाठी निधीही अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. खरे तर, शिष्यवृत्तीचा जून महिन्यात पहिला तर नोव्हेंबरमध्ये दुसरा आणि जानेवारीत तिसरा हप्‍ता देणे क्रमप्राप्त आहे. किंबहुना तसे सरकारचेच आदेश आहेत. तरीही विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्ष शिष्यवृत्ती मिळत नसल्याने सरकारचेच आदेशच बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. यावर्षी शिष्यवृत्ती नेमकी कशा पद्धतीने द्यायची, यासंदर्भात समाजकल्याण विभागाने सरकारचे मार्गदर्शन मागविले आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही माहिती सूत्रांनी दिली.