Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Nashik › ‘मुक्‍ती’ मिळाली, मानसिकतेचे काय?

‘मुक्‍ती’ मिळाली, मानसिकतेचे काय?

Published On: Jan 03 2018 9:07AM | Last Updated: Jan 03 2018 9:06AM

बुकमार्क करा
नाशिक : पुढारी ऑनलाईन

‘विद्येविना मती गेली’ असे अत्यंत तळमळीने सांगणार्‍या महात्मा जोतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणासाठी उभे केले. सावित्रीबाईंनी प्रतिगामी शक्‍तींचा विरोध झुगारून लावत महिलांच्या शिक्षणाची क्रांतिज्योत प्रज्वलित केली. त्यातून महिलांचे जगणे नुसते सुकरच झाले नाही, तर त्याला प्रगतीचे पंखही फुटले. सावित्रीबाईंच्या कार्याला आज सव्वाशे वर्षे उलटून गेली असताना, निरनिराळ्या क्षेत्रांत महिला भरारी घेताना दिसतात खर्‍या; पण अद्यापही पुरुषप्रधान मानसिकतेची बीजे डोके वर काढताना दिसतातच. ग्रामीण भागांतील महिलांपर्यंत तर ‘स्त्रीमुक्‍ती’ हा शब्दही पोहोचलेला नाही. समाजातील प्रस्थापितांविरोधात निडरपणे उभ्या ठाकत महिला शिक्षणाचा पाया रचणार्‍या सावित्रीबाईंची आज जयंती. हा दिवस ‘महिला मुक्‍ती दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महिलांचे स्वातंत्र्य, त्यांना मिळत असलेली वागणूक व अन्य मुद्द्यांवर जिल्ह्यातील निरनिराळ्या क्षेत्रांतील महिलांच्या या प्रतिक्रिया...

सावित्रीबाईंमुळेच महिलांना प्रतिष्ठा
सावित्रीबाई भारताची पहिला महिला शिक्षिका, समाजसुधारक व मराठी कवयित्री होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचासमवेत महिलांचे अधिकार व समाजकार्यात स्वत:ला झोकून देत, समाजापुढे आदर्श उभा केला. आज त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या महिला सज्ञान होवून, फक्त चूल व मूल यात न अडकता समाजकार्य करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळेच महिला असूनही ताठ मानेने जगतो आहोत.
-सुनीता चारोस्कर, सभापती, जि. प. समाजकल्याण, नाशिक

वेगळी ओळख हेच अभिवादन
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. त्यांनी आम्हाला मूलमंत्र दिला. ‘शिक्षणाने येते मनुष्यत्व पशुत्व हरते पहा’ हा मूलमंत्र आमच्या जीवनाचा अभ्युद्य
करणारा ठरवा. आम्ही त्यांच्या क्रांतीकार्यामुळे शिकून पुढे आलो. स्वत:च्या कर्तृत्वाने ही पदे, सत्तास्थाने काबीज केली म्हणून आम्ही आमच्यातील स्त्रीत्व कायम ठेवून मिळालेल्या संधीचं सोनं करून समाजोपयोगी किती होता येईल याचा प्रयत्न करीत आहोत. यानिमित्त स्त्रियांनी शिक्षण घेत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संदेश काळजात कोरून ठेवला पाहिजे. विद्यार्थीनिंनी शिक्षण घेऊन नुसते चूल-मूल एवढ्यापुरते मर्यादित न राहता वेगळी ओळख निर्माण करावी. हेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल.
- डॉ. एस. एस. घुमरे, प्राचार्या, पिंपळगाव बसवंत

प्रश्‍न फक्‍त मानसिकतेचा
महिला सध्या कायद्याने पूर्ण स्वतंत्र आहेत व त्या सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. फक्‍त प्रश्‍न आहे तो मानसिकतेचा. अद्यापही सर्वसामान्य महिला आपल्या क्षमतेविषयी न्यूनगंड बाळगतात. स्वत:ला दुय्यम समजतात. नोकरदार व व्यावसायिक महिला त्यामानाने बर्‍याच प्रगत आहेत. अर्थात, ही परिस्थिती केवळ भारतातच नव्हे, तर अन्य पुढारलेल्या देशांतही आहे. त्यासाठी पुरुषांनीही मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरी पन्नास वर्षांपूर्वीपेक्षा आताची परिस्थिती खूप चांगली आहे. पूर्वी स्त्रिया एकट्या घराबाहेरही पडू शकत नव्हत्या. मात्र महिलांसंदर्भातील आंदोलनांना यश आल्याने बदल झाला आहे.
- निशिगंधा मोगल, माजी आमदार

शिक्षणामुळे महिला सक्षम
आज महिला राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, तंत्रज्ञान, संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. याचे मुख्य कारण चूल आणि मूल सांभाळणारी एक अबला आज शिक्षणामुळे सक्षम झाली आहे. या शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी रोवली होती. किंबहुना सर्वच क्षेत्रात जे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळते आहे. त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना आहे.
- अश्‍विनी आहेर, जिल्हा परिषद सदस्य, न्यायडोंगरी, ता. नांदगाव

सोशल मीडियापुरते मर्यादित
महिलामुक्‍ती वगैरे गोष्टी निव्वळ सोशल मीडियापुरत्या मर्यादित आहेत. तरुण पिढीमध्ये या प्रश्‍नाबाबत अजिबात संवेदनशीलता नाही. ग्रामीण भागांत काम करताना याची प्रकर्षाने जाणीव होते. तेथे अद्यापही 14-15 व्या वर्षी मुलींची लग्‍ने आणि 16-17 व्या वर्षी बाळंतपणे होतात. अल्पवयातील लग्‍नाचे दुष्परिणाम, जबाबदार्‍या यांचीही जाणीव मुलींना नसते, त्या वयात हे सारे होऊन जाते. यासंदर्भातील सरकारी आकडेवारी भ्रामक आहे. शिक्षणाबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे मुक्‍ती दिन वगैरे प्रतीके ठीक आहेत; पण हे सारे सोशल मीडियावर व्यक्‍त करण्याऐवजी तेच हात प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास खूप प्रश्‍न सुटणार आहेत.
- श्यामला चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या, नाशिक